साप्ताहिक युगांतर

कामगार-शेतकरी, दलित, महिला, विद्यार्थी-युवक यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे..

शोषितांना शोषणमुक्तीचे हत्यार देणारे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी, कामगार नेते, लोकशाहीर, साहित्यरत्न, साहित्य सम्राट कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आज सांगता होत आहे. शासनाने गेल्या वर्षी अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षाची सुरवात तर केली परंतु त्या अनुषंगाने वर्षभर काही झाल्याचे दिसून आले नाही. शासनाने अण्णाभाऊंकडे दूर्लक्ष केले म्हणून ते निश्चितच खुजे होत नाहीत.

अतिशय सामान्य परिस्थितीमधून आलेल्या आणि उनेपुरे एकोणपन्नास वर्षे आयुष्य लाभलेल्या अण्णाभाऊंचे कार्य थक्क करणारे आहे. अण्णाभाऊ साठेंचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. अण्णाभाऊ साठे स्वातंत्र्य सैनिक, कम्युनिस्ट पक्षाचे नेते, कामगार नेते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी, लोकशाहीर, साहित्य सम्राट,…असे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे अनेक पैलू आहेत. अण्णाभाऊंची जन्मशताब्दी साजरी करत असताना अण्णाभाऊंच्या अनुयायांयाची अवस्था ‘एक हात्ती आणि सात आंधळे’ या कथेतील सात आंधळ्यांसारखी झालेली दिसते.

अण्णाभाऊंचे काही अनुयायी त्यांना ‘साहित्यसम्राट’ म्हणतात, काही ‘लोकशाहीर’, काही’, काही ‘सत्यशोधक’, काही ‘मार्क्सवादी’ तर काही ‘आंबेडकरवादी’ म्हणतात. अण्णाभाऊंच्या अनुयायांनी अण्णाभाऊंना लावलेली ही सर्व विशेषणे बरोबरच आहेत. परंतु आम्ही अण्णाभाऊंना लावतो तेच विशेषण ‘बरोबर’ आहे आणि इतर लावतात ते चूक आहे, ही जी अहमहमिका लागलेली आहे ती ‘चूक’ आहे. अशा प्रकारे प्रचार करून आपण अण्णाभाऊंना संकुचित करतो आहोत याचे भानही या अनुयायांना नाही ही खेदाची बाब आहे.

अण्णाभाऊ काॅम्रेड नव्हते, अण्णाभाऊंनी कम्युनिस्ट विचारांचा त्याग केला होता, कम्युनिस्ट पक्षाने अण्णाभाऊंची उपेक्षा केली असा तद्दन खोटा प्रचार केला जात आहे. वाटेगांवसारख्या छोट्याशा खेड्यातून स्थलांतरीत मजूर म्हणून मुंबईत आलेले अण्णाभाऊ साठे तिथे कामगार झाले आणि कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील कामगार चळवळीचा भाग बनले. तत्कालीन कम्युनिस्ट नेत्यांनी अण्णाभाऊंमधे वंशपरंपरेने आलेली शाहीरी आणि कलागुणांना वाव दिला. कामगार चळवळीत मिळालेल्या प्रोत्साहनामुळे अण्णाभाऊंच्या प्रतिभेला धुमारे फुटले, त्यांच्यातील शाहीर आणि साहित्यिकाला जागतिक दृष्टिकोन प्राप्त झाला. अण्णाभाऊ चिकित्सा करू लागले, वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करायला लागले आणि यातून मिळालेल्या दृष्टिकोनामुळेच अण्णाभाऊंनी “पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे” असे विधान करून पृथ्वीची शेषनागाच्या मस्तकावरून सुटका केली आणि ती दलित-श्रमिकांच्या तळहातावर आणुन ठेवली. लाखो वर्षांच्या मानवी इतिहासात भारतात हे प्रथमच घडले होते.

हिटलरच्या फॅसिस्ट साम्राज्यवादी धोरणाचा रशियन जनतेने धीरोदात्तपणे मुकाबला करत केलेल्या पराभवाचे वर्णन स्टॅलिनग्राडच्या पोवाड्यातून अण्णाभाऊंनी जगासमोर मांडले तर मुंबईच्या लावणीच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी मुंबईतील विषमतेचे स्वरूप चव्हाट्यावर आणले.

कामगार चळवळीत काम करीत असताना अण्णाभाऊ संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बीनीचे शिलेदार बनले. ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!’ ही घोषणा “लाल बावटा कला पथकाच्या” माध्यमातून काॅम्रेड अण्णाभाऊ साठे, काॅम्रेड अमर शेख आणि काॅम्रेड गव्हाणकर या त्रयीने महाराष्ट्रात तळागाळापर्यंत पोहंचवली. त्यामुळेच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही स्वतंत्र भारतातील शेतकरी कामगारांची पहिली चळवळ ठरली. सर्व सामान्य माणूस या चळवळीत उतरला म्हणून इच्छा नसतानाही देशाच्या नेतृत्वाला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र द्यावा लागला. परंतु संयुक्त महाराष्ट्र देताना देशाच्या नेतृत्वाने मराठी माणसाशी गद्दारी केलीच. बेळगाव, निपाणी, कारवार, भालकी हा मराठी भूभाग महाराष्ट्रात सामील केला नाही याचे अण्णाभाऊंना अतिशय दुःख झाले ते त्यांनी “माझी मैना गावावर राहिली…” या गिताद्वारे व्यक्त केले आहे.

अण्णाभाऊंनी विपुल लेखन केले आहे. त्यांच्या कथा आणि कादंब-यांचे नायक नायिका या श्रमिक-कष्टकरी वर्गातील आहेत. आणि हे नायक नायिका लढणा-या आहेत. अन्यायकारक व्यवस्थे विरोधात त्यांनी बंड केले आहे. अनिष्ठ रूढी परंपरा त्यांनी लाथाडल्या आहेत. गोरगरिबांना साथ देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. अण्णाभाऊंचा कम्युनिस्ट पक्ष शोषणमुक्त समाज रचना निर्माण करण्यासाठी झटत असताना डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या जातीअंताच्या लढाईचा इतरांप्रमाणे अण्णाभाऊंवर देखील प्रभाव पडलेला होता. या दोन्ही चळवळी जग बदलण्यासाठीच झटत होत्या. म्हणूनच अण्णाभाऊ म्हणतात “जग बदल घालूनी घाव, मला सांगून गेले भीमराव” या दोन्ही चळवळी शोषित श्रमिकांच्या चळवळी असून त्यांना एकमेकींच्या हातात हात घालून चालण्याची दिशा अण्णाभाऊ दाखवतात. मात्र या दोन शक्ती एकत्र आल्या तर आपली धडगत नाही हे येथील भांडवलशाही मनुवादी शक्तींनी पुरते ओळखले असल्याने अण्णाभाऊ कम्युनिस्ट नव्हतेच तद्वतच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि कम्युनिस्टांना एकमेकांच्या विरोधात उभा करण्याचे प्रयत्न अतिशय चिकाटीने सुरू असतात.

स्वातंत्र्योत्तर काळात येथील नवसत्तधा-यांनी एक कुटील षडयंत्र रचले आहे. शोषितांसाठी लढलेले महापुरूष हायजॅक केले आहेत. ते कोणत्याही जातीधर्माचे नसताना ओढूनतानून त्यांना जातीधर्माच्या कोंडवाड्यात कोंडण्याचे प्रयत्न केले गेले. हे करत असताना त्या महापुरूषांचे विचार अलगद बाजूला ठेवण्यात आले. प्रत्येक जातीला एकेक महापुरूष देवून त्यांच्या अस्मिता टोकदार करण्यात आल्या. काॅम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्यावरही हा प्रयोग करण्यात आला. मातंग समाजाला कुणी महापुरूष देणे गरजेचे होते तेंव्हा अण्णाभाऊ मातंग असल्याचा शोध यांना लागला. आणि मग इतर महापुरूषांप्रमाणेच अण्णाभाऊंच्या क्रांतिकारी विचारांना बाजूला करून अण्णाभाऊंच्या मागे एकेक विशेषण चिकटवणारे समूह निर्माण करून त्यांना एकमेकांच्या विरोधात उभे करण्यात आले.

आज श्रमिक-कष्टकरी वर्गाचे प्रचंड हाल होत आहेत. कामगार देशोधडीला लागला आहे. कोरोनाने त्यांचे विदारक चित्र देशासमोर आणले आहे. लाॅकडाऊन लागू झाल्यावर उपजीविकेचे साधन नसल्याने लाखो कामगार आपल्या गावी जाण्यासाठी हजारो किलोमीटरची पायपीट कशी करत होते आणि यात हजारो जण कसे शहीद झाले हे ताजे उदाहरण आपण पाहिले आहे. स्वातंत्र्य पाऊनशे वर्षाचे होत असताना एक दिवस काम नसेल तर जीवन जगणे या मोठ्या श्रमिक जनसमुहाला किती अवघड आहे याचे विदारक चित्र कोरोनाने घडवले आहे. गावी कुठलेही उपजीविकेचे साधन नसल्याने लाखो लोक कसे जीवन जगत असतील याचे व्यवस्थेला काही दणेघेणे नाही. कामगारांची अशी केविलवाणी अवस्था झाली असताना दुसरा श्रमिक वर्ग म्हणजे शेतकरी. आजतागायत व्यवस्था त्याला ओरबाडून खात आहे. त्याला आपल्या श्रमाचा मोबदला अद्याप पर्यंत दिला जात नाही. जगाच्या पोशिंदयाने आपल्या घामाने उत्पादित केलेल्या मालाची किंमत आजही बोली लावत दलाल आडतेच ठरवतात. खर्च जास्त आणि उत्पादन कमी अशी शेतकरी वर्गाची परिस्थिती असल्याने कर्जाचा बोजा वाढल्याने त्याला आत्महत्या कराव्या लागतात. शेतक-यांचे दारिद्र्य संपवण्यासाठी स्वामिनाथन आयोगाने शेतीमालास उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा असा भाव देण्याची शिफारस केली मात्र ती ना काॅग्रेसने स्विकारली ना भारतीय जनता पक्षाने.

अशा या कालखंडात शोषक व्यवस्थेला आव्हान देवू शकतात आंबेडकरी विचार आणि साम्यवादी विचारच. काॅम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी या सुत्राचे सूतोवाच केले होते. हाच धागा पकडून कन्हैयाकुमार सारखे प्रतिभाशाली तरूण ‘जयभीम लाल सलाम ‘ चा नारा देत अण्णाभाऊ स्टाईलने व्यवस्थेला प्रश्न विचारत आहेत. तेंव्हा निरुत्तर होत असलेली व्यवस्था त्यांचावर देशद्रोहीपणाचे शिक्के मारून स्वतः ला वाचविण्याचे केविलवाणे प्रयत्न करताना दिसते आहे….!!

– राजकुमार कदम, बीड