साप्ताहिक युगांतर

कामगार-शेतकरी, दलित, महिला, विद्यार्थी-युवक यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे..

टिळकांची दुसरी बाजू..

बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त टिळकांच्या संदर्भात बरीच उलट सुलट चर्चा समाजमाध्यमे व वर्तमानपत्रात होत आहे. टिळकांच्या संदर्भात प्रकाशित केलेला विशेषांक ज्याच्याजवळ नसेल ती व्यक्ती ‘असुसंस्कृत’ असे प्रमाणपत्र लोकसत्ताकारांनी दिले; तर दुसरीकडे एका डाव्या कामगार संघटनेने टिळकांचे स्मरण केल्यानंतर, सरसकट डावे ‘ब्राम्हणी’, असे प्रमाणपत्रही बुके वाचून आणि न वाचूनही फेस आणणाऱ्या ‘फेस्बुक्यानी’ देण्यास सुरुवात केली. सोशालिस्ट्स, कम्युनिस्ट व इतरही अनेक पक्ष-संघटना तसेच विविध समाज घटकात कार्यरत असणाऱ्या जनसंघटना अशा पन्नास-शंभर पक्ष-संघटनांना तरी डावे म्हणून संबोधले जाते. फेसबुक्यांचा रोख मात्र प्रामुख्याने कम्युनिस्टांवर असतो. शिकार कधी टप्यात येथे व कधी ‘ब्राम्हणी’ विशेषणे लाऊन दुषणे देता येतील याची वाटच ते पाहत असावेत. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवांची नावे घेउन ‘ब्राम्हणी’ छावणीचा ‘पाहुणचार’ घेणाऱ्यांना हे फे.बु.लेखकराव काही म्हणत नाहीत. त्यांना ‘ब्राम्हणी’ अशी उपमा ही ते देत नाहीत. ब्राम्हण असलेली व्यक्ती ‘ब्राम्हणी’ व स्वजातीतील परंतु ‘ब्राम्हणी’ छावणीतील व्यक्ती मात्र ‘ब्राम्हणी’ नाही, कारण ती ”आपली” असते! आपल्या महानायकाचे नाव सतत घेते!!

जात, वर्ग, स्त्री दास्य अंतासाठी कार्यरत असणाऱ्या व ज्यांच्यासोबत सहप्रवास गरजेचा आहे, अशी रेषेच्या अलीकडची मंडळीच एकमेकांना दूषणे देण्याची स्पर्धा करीत असतील, तर फॅसिस्ट, धर्मांध शक्तींना वेगळे काही करण्याची गरजच नाही. टिळकांचा उदोउदो करताना त्यांच्यातील सनातन्यांवर, त्यांच्यातील सुप्त मनुवर पांघरून घालण्याचे काम बरेच जण करतात हे वास्तव आहेच. ते नाकारता येत नाही. कम्युनिस्टांनी असे पांघरूण घातलेले नाही.

शिंपी समाजातील भाकपचे दिवंगत नेते, मिरत खटल्यात तुरुंगवास भोगलेले, गिरणी कामगार लढयातीलअग्रणी, आयटकचे अध्यक्ष राहिलेले, आंतरराष्ट्रीय परिषदांत भागीदारी केलेले, मुंबईचे एकेकाळचे महापौर राहिलेल्या कॉ. शांताराम मिरजकर यांचाही टिळकांचा याबाबतीतील अनुभव चांगला नाही. १९१८ साली प्रांतिक परिषदेसाठी एका मित्रासोबत कॉ. मिरजकर नशिकला गेले होते. स्वयंसेवक म्हणून त्यांची व्यवस्था केतकर नावाच्या टिळकांच्या जावयाकडे केलेली होती. तेथे कॉ. मिरजकरना सर्वांसोबत जेवण्याच्या पंक्तीस बसता नाही आले. त्यांना स्वतःची भांडीही घासावी लागली. स्वाभिमानी कॉ. मिरजकरांनी उर्वरित दिवस केतकरांच्या घरी न जेवता बाहेर टपरीवर नाशिकचा चिवडा व जिलेबी वगैरे खाऊन पोट भरले. ही बाब स्वतः मिरजकरांनी ”अंधारातून प्रकाशाकडे” या आपल्या चरित्रात लिहून ठेवली आहे. हे टिळकांच्या जावयाकडे जरी घडलेले असले तरी टिळकांच्या हजेरीत घडलेले होते. तरीही त्यावेळेची ‘रूढी’ असे समजून शिंपी म्हणून वेगळी वागणूक मिळालेल्या मिरजकरांनी टिळकांचा दुस्वास न करता परिषदेच्या कामात सक्रिय राहिले. हा कॉ. मिरजकरांचा मोठेपणा होता. सनातनी टिळकांची बाजू कधीही कम्युनिस्टांनी घेतली नाही. अन्यथा मिरजकरांचे हे चरित्र कम्युनिस्टांशी संबधित PPH ने प्रकाशित केलेच नसते.

टिळकांच्या राजकीय कार्याबद्दल कॉ. डांगेंना, कॉ. मिरजकरांना, कामगारांना, कम्युनिस्टांसह समाजवाद्यांना व इतर अनेकांना आकर्षण होते. पुष्पा भावेसारख्या विदुषी, ग. प्र. प्रधान यांच्यासारखे अनेक समाजवादी आदींसह अनेकांना टिळकांचे राजकीय कार्य आवडते. त्यांना काय म्हणणार?

साधनेचा विशेष अंक निघतोय असे समजले. त्याचे काय करणार? की फक्त डांगेंचे उदाहरण देऊन डांगे यांची परंपरा जपणाऱ्यांना आणि न जपणाऱ्यांनाही झोडत बसणार? त्यांना ‘ब्राम्हणी’ ठरवून निकाली काढणार? काही प्रसंगी कॉ. डांगे यांना पक्षशिस्तीचा भंग केल्यामुळे पक्षाने नोटिसाही दिलेल्या होत्या व आणीबाणीनंतर तर पक्षातून त्यांना काढूनही टाकण्यात आले. त्यांचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी मृत्युपर्यंत शेवटची सुमारे ३०-३५ वर्षे संबंध नव्हता. असे असले तरी कॉ.डांगे यांनी केलेल्या कार्याकडे, त्यांच्या योगदानाकडे, लिखाणाकडे डोळेझाक करून चालणार नाही. त्यावर चर्चा होऊ शकते. वेगळी मते असू शकतात. ती मांडली पाहिजेत, टीका केली पाहिजे. परंतु त्यांना ‘ब्राम्हणी’ ठरवून निकाली काढता कामा नये किंवा कॉ. डांगे यांच्या कार्याचे आकर्षण असणाऱ्यांनाही हिणवता कामा नये. ‘सिलेक्टेड हिणवणे’ नसावे.

भारतातील विविध कामगार संघटनांना एकत्र करून या सर्व संघटनांचा पहिला देशव्यापी महासंघ म्हणजे All India Trade Union Congress – आयटक. आयटकच्या स्थापनेत टिळकांचा पुढाकार होता किंवा टिळकांनी कामगारांचे लढे लढवले असे म्हणणे हे अतिशयोक्तीचे ठरेल. आयटकचे पहिले अध्यक्ष ते होणार अशी चर्चा सुरु होती व तसे कदाचित झालेही असते. परंतु आयटकच्या १९२० मध्ये झालेल्या पहिल्या अर्थात स्थापना अधिवेशानापूर्वीच त्यांचे निधन झाले. सनातनी वृत्तीचे, स्वराज्यात केवळ उच्चवर्णीय संसदेत जातील असे म्हणणारे, शिंपी तेथे काय शिवत बसणार आहेत का? कुणबी काय संसदेत नांगर चालवणार आहेत काय? असे म्हणणारे फॅसिजम, नाझीजमला
केसरीतून भरपूर जागा देणारे लेखक – भक्त तयार करणारे, हिंदू महासभेसाठी फौज तयार करणारे टिळक आयटकचे अध्यक्ष झाले नाहीत हे चांगलेच झाले. आणि जरी झाले असते तरी आयटक ही काही तेव्हा कम्युनिस्टांची संघटना नव्हती, हे लक्षात घेतले पाहिजे. आयटक १९२० साली स्थापन झाली, तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष त्यानंतर पाच वर्षांनी १९२५ मध्ये स्थापन झाला. आयटकचे पहिले अध्यक्ष लालालजपत राय किंवा त्यानंतर अध्यक्ष झालेले पंडित जवाहरलाल नेहरू तसेच अनेक पुढारी कम्युनिस्ट नव्हते. आयटकच्या स्थापना अधिवेशनात तर डांगेही उपस्थित नव्हते.

१९०८ साली टिळक तुरुंगात असताना मुंबईच्या कामगारांनी सहा दिवस संप केला, याचा अर्थ कामगारांचे पुढारपण टिळकांनी केले होते, प्रचंड लढे त्यांनी लढवले होते असा नाही. स्वातंत्र्य चळवळीतील टिळकांसह अनेक नेत्यांबद्दल कामगारांना ममत्व होते. आपापल्या मागण्यांसाठी संघर्ष करत असताना इंग्रज साम्राज्यवादाविरोधातही कामगार वर्ग संघर्ष करीत होता, यात कामगारांचे मोठेपण होते, इतरांचे नाही. केवळ १९०८ साली कामगारांनी असा बाणा दाखवला असेही खचितच नाही. १९४६ च्या नाविकांच्या बंडात, संयुक्त महाराष्ट्र लढ्यात, गोवा मुक्ती संग्रामात, AISF चे अधिवेशन मुंबईत न भरण्याचा चंग बांधलेल्या मोरारजी देसाई यांच्या
दडपशाही विरोधात विद्यार्थ्यांसोबतच्या संघर्षात कामगार वर्ग आघाडीवर होता. म्हणजे टिळकांना अटक झाली व कामगारांनी संघर्ष केला हे खरे जरी असले, तरी ती काही कामगारांनी झोकून देण्याची एकमेव घटना नव्हती. स्वातंत्र्यासाठी झोकून देण्याची उर्मी कामगारांना त्यांच्या लढ्यातून मिळालेली होती. तो कामगारांचा मोठेपणा होता.

टिळकांनी स्वराज्यासाठीचा लढा केला खरा, परंतु उच्च जातीपुरते ते मर्यादित होते. पेशवाई बुडाल्यामुळे आपले गेलेले वैभव पुन्हा मिळेल, असा टिळकांच्या लढ्यातून या समाजाला विश्वास वाटत होता. परंतु महात्मा गांधींच्या व्यापक लढ्यामुळे टिळकांना मानणारे हे उच्चवर्णीय अस्वस्थ झालेले होते. गांधींनी महिलांना राजकारणात आणले. मताचा अधिकार सर्वांना हवा अशी भूमिका घेतली. अस्पृशतेचा मुद्दा हाती घेतला. संस्थाने बरखास्त करण्याची मागणी केली. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या बहुतांश टिळक भक्तांनी टिळकांनंतर हिंदू महासभेची वाट धरली.

टिळकांचे विश्वासू असे हेडगेवारही अस्वस्थ होते. एकीकडे गांधींची व्यापक चळवळ, दुसरीकडे कामगार चळवळीच्या माध्यमातून व इतर अनेक लढ्यातून रुजत चाललेली कम्युनिस्ट चळवळ व तिसरीकडे १९२० साली डॉ. बाबासाहेबांचे भारतात आगमन व ‘मूकनायक’चा प्रारंभ यांच्या एकत्रित परिणामी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली, आदी मुद्यांची चर्चा भाकपच्या शिबिरातही होत आलेली आहे.

इटलीच्या संशोधक मार्झिया कासोलरी यांनी ”Hindutva’s Foreign Tie-up in the 1930s : Archival Evidnce” असा एक संशोधनपर लेख २००० सालच्या जानेवारीच्या EPW अंकात लिहिला होता. त्या म्हणतात, ‘केसरीने अग्रलेखांतून, विविध लेखांतून फॅसिजमचा उदोउदो केला. इटलीला अराजकतेपासून फॅसिजमने वाचवले असे एका अग्रलेखात म्हटले आहे. १९२० च्या दशकात मुसोलिनी, फॅसिजम आदींचे महाराष्ट्रीय तरुणांना प्रचंड आकर्षण होते. टिळकांच्या निधनानंतरही मुसोलिनीने अंगिकारलेल्या राजकीय सुधारणांवर टिळक पंथीयांनी केसरीत भरपूर लिखाण केले. पोलिसांच्या नोंदीत टिळकांचे शिष्य असलेल्या माधव दामले नावाच्या गृहस्थाने त्यांच्या ”लोखंडी मोर्चा” साप्ताहिकात वेळोवेळी लिखाण केले आहे. ते टिळकांचे शिष्य होते अशी पोलिसांत नोंद असल्याचे या संशोधनपर लेखात मारझिया यांनी म्हटले आहे. ”Fascism against Communism” या एका विदेशी लेखकाच्या पुस्तकाचा अनुवाद करून ”लोखंडी मोर्चा”मध्ये माधव दामलेंनी ५ भागात प्रकाशित केले होते, असे मार्झिया म्हणतात. (हा संपूर्ण शोधनिबंध संदर्भासह नेटवर उपलब्ध आहे.)

विवाह काळ व संभोग काळ या संदर्भातील विधेयकास टिळकांनी केलेला विरोध व सनातन्यांची घेतलेली बाजू सर्वश्रुत आहे. टिळकांनी मार्क्सवाद भारतात आणला असे काही जणांचे म्हणणे तर हास्यास्पद आहे. भाकपने प्रकाशित केलेल्या कोणत्याही पुस्तकात असा उल्लेख नाही. उलट टिळकांच्या निधनापूर्वी १० वर्षे अगोदर ‘कॉम्रेड’ हा शब्द सर्वप्रथम १९१० साली अहमद अली यांनी आणला. त्यांनी ‘कॉम्रेड’ नावाचे उर्दू साप्ताहिक कोलकात्याहून प्रकाशित करणे सुरु केले होते. जनतेवर आपल्या विचाराचा प्रभाव पाडणारे हे वृतपत्र सरकारच्या डोळ्यात खुपू लागले व सरकारने अहमद अली यांना १९१५ ते १९१९ पर्यंत म्हणजे पहिले महायुद्ध संपेपर्यंत तुरुंगात डांबले होते, असा उल्लेख कॉ. ल. स. कारखानीस आणि कॉ. कृष्णा मेणसे यांनी लिहिलेल्या व भाकपने प्रकाशित केलेल्या पुस्तिकेत केला आहे. भाकपने याची दखल घेतलेली आहे. तेव्हा सरफराज अहमद म्हणतात, त्याप्रमाणे मार्क्सवाद रुजवण्यात, तो विकसित करण्यात मुस्लिमांचा मोठा सहभाग होता हे खरेच आहे. कम्युनिस्टांनीही त्याकडे दुर्लक्ष केलेले नाही, हे सरफराज अहमद यांनी लक्षात घ्यावे. अर्थात सरफराज यांनी त्यांच्या लेखात दिलेली मार्क्स व गालिब यांच्या पत्रव्यवहारासंदर्भातील व इतर माहिती नवीन आहे, महत्वाची आहे. ते वाचून फार बरे वाटले.

तात्पर्य… टिळकांचा उदोउदो कम्युनिस्टांनी कधी केलेला नाही. त्यांच्या राजकीय कार्याची दखल अनेकांनी घेतली
आहे. फक्त कम्युनिस्टांनी नाही. त्यावर चर्चा होऊ शकते. टिळकांचा सनातनीपणा, टिळकांच्या पठडीत तयार झालेल्या शेकडो उच्चवर्णीय भक्तांनी,अनुयायांनी हिंदू महासभेची व संघाची धरलेली कास, टिळक पंथीयांचे इटली-मुसोलिनी व फॅसिजमचे प्रेम, केसरीचे अग्रलेख व अन्य लेखांतून या विचारांना दिलेली भरपूर प्रसिद्धी, स्वराज्याचा अर्थ म्हणजे फक्त उच्चवर्णियांनी संसदेत जाणे असे टिळकांनी केलेले १९१६ चे जाहीर विधान, बहुजनांचा दुस्वास इ. बाबी आपल्या प्रकाशनाद्वारे भाकपने जाहीर केलेल्या आहेत. शिबिरातून कार्यकर्त्यांना टिळकांची ही दुसरी बाजूही सांगितली जाते.
– प्रा. कॉ. राम बाहेती, औरंगाबाद
९४२२७१२९३३