साप्ताहिक युगांतर

कामगार-शेतकरी, दलित, महिला, विद्यार्थी-युवक यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे..

‘महामुक्काम’ आंदोलनात किसान सभा, आयटक पूर्ण ताकदीनिशी उतरणार!

मुंबईत दिनांक २४, २५ आणि २६ जानेवारी २०२१ रोजी होणार आंदोलन

नाशिक : महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि आयटक कामगार संघटना या राज्यस्तरीय “महाराष्ट्र शेतकरी कामगार मोर्चा”च्या सदस्य असून, मुंबईत दिनांक २४, २५ आणि २६ जानेवारी २०२१ रोजी होणाऱ्या संयुक्त शेतकरी कामगार मोर्चामध्ये या दोन्ही संघटनांचे महाराष्ट्रातील शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने सहभागी होणार आहेत.केंद्र सरकारने चुकीच्या पद्धतीने राज्यसभेत पास केलेल्या तीन कृषी बिलांच्या विरोधात, प्रस्तावित वीज बिल कायदा 2020, विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पहिल्या दिवसापासूनच अखिल भारतीय किसान सभा सहभागी आहे. 2 जानेवारी 2021 रोजी महाराष्ट्रतील किसान सभेचे कार्यकर्ते नागपूर येथे जमून वाहन जथ्याने शहाजापूर दिल्ली बॉर्डरला आंदोलनात सहभागी झाले होते.

या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व तीन कृषी बिले व कामगार विरोधी ४ श्रमसहिंता रद्द कराव्यात या मागणीसाठी किसान सभा, आयटक संपूर्ण महाराष्ट्रात गेले अनेक दिवस ठिकठिकाणी संविधानिक मार्गाने आंदोलन करत असून, मुंबईत दिनांक २४, २५ व २६ जानेवारी २०२१ रोजी होणाऱ्या ‘महामुक्काम’ आंदोलनात किसान सभा, आयटकचे राज्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

या आंदोलनाची रूपरेषा पुढीलप्रमाणे..

  • १. या आंदोलनांतर्गत शनिवार दिनांक २३ जानेवारी रोजी राज्याच्या विविध भागातून कार्यकर्ते रेल्वे, बस, मोटारगाडीने मुंबईकडे जाण्यास निघतील व रविवार दिनांक २४ जानेवारीला मुंबईत पोहोचतील. रविवार दिनांक २४ जानेवारी व सोमवार दिनांक २५ जानेवारी रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर “महामुक्काम” आंदोलन होईल.
  • २. सोमवार दिनांक २५ जानेवारी २०२१ रोजी दुपारी दोन वाजता सर्व संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या माध्यमातून राजभवनावर मोर्चा काढून राज्यपालांना निवेदन देण्यात येईल.
  • ३. मंगळवार दिनांक २६ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ९ वाजता मुंबईतील आझाद मैदानामध्ये ध्वजवंदन होऊन या संपूर्ण मोर्चाचा समारोप होईल.

हे आंदोलन अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, जनआंदोलन संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने होणार असून, यात “महाराष्ट्र शेतकरी कामगार मोर्चा” चा सक्रिय सहभाग व पाठिंबा असेल.या आंदोलनास सर्व बिगर भाजप राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला असून, राज्यातील विद्यार्थी, तरुण, महिला व कष्टकऱ्यांच्या संघटनाही या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात होणाऱ्या ‘महामुक्काम’ आंदोलनास राज्यातील जनतेने पाठिंबा देऊन, त्यात सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य किसान सभा व आयटकच्यावतीने राज्य सचिव राजू देसले, नाशिक जिल्हा अध्यक्ष भास्कर शिंदे, जिल्हा सचिव देविदास भोपळे, जिल्हा संघटक विजय दराडे, उपाध्यक्ष सुखदेव केदारे, दत्तात्रेय गांगुर्डे, आयटकचे जिल्हाध्यक्ष व्ही. डी. धनवटे, अरुण म्हस्के, दत्ता निकम, सखाराम दुरगुडे, कुलकर्णी, माया घोलप, एस. खतीब, जी. एच. वाघ, दत्तू तुपे, साधना गायकवाड, रमजान पठाण, प्रा. के. एन. अहिरे, नामदेव बोराडे, घुले विठोबा, मधुकर मुठाल, निवृत्ती कसबे, संपत थेटे, बाबासाहेब कदम, अनिल बीचकूल, रावसाहेब डेमसे, किरण मालूनजकर, भीमा पाटील, राजू नाईक, प्रमोद पाटील, एकनाथ दौंड, शिवाजी पगारे आदींनी केले आहे.