साप्ताहिक युगांतर

कामगार-शेतकरी, दलित, महिला, विद्यार्थी-युवक यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे..

महाराष्ट्रात सर्वांनाच विनामूल्य लसीकरण करावे

भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; असंघटीत कामगारांनाही भरघोस मदत द्या!

मुंबई : देशात वाढत असलेला कोरोनाचा कहर लक्षात घेऊन, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देशातील सर्व जनतेला मोफत कोरोना लसीकरणाची सोय उपलब्ध करून द्यावी, तसेच केंद्रामार्फत सर्व राज्यांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन (प्राणवायू) उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कॉम्रेड डी. राजा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही सर्वच वयोगटातील नागरिकांना विनामूल्य लसीकरण करावे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र पक्षाचे राज्य सचिव कॉ. तुकाराम भस्मे व मुंबईचे सचिव कॉ. प्रकाश रेड्डी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविचले आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे, की आपल्या महाराष्ट्र राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत आहे. मात्र अशा गंभीर काळात आपण स्वतः जाणीवपूर्वक लक्ष घालून उपाययोजनेसंबंधात प्रयत्न करीत आहात, याचे आम्ही स्वागत करतो. तथापि राज्यातील अनेक कोविड रुग्णालयाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी व अनियमित होत असल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. तसेच कोरोना लसीकरणासाठी पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नसल्यामुळे लसीकरण थांबविण्याची वेळ येत आहे, हे वास्तव आहे.

केंद्राने १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांनाच लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. त्याची आपल्या राज्यात अंमलबजावणी करताना सर्वांनाच विनामूल्य लस मिळाची, अशी आमची मागणी आहे.

या महामारीच्या काळात कर्तव्यावर असणाऱ्यांना आपण कोरोना योद्धा घोषित करून, त्यांना विमा संरक्षण जाहीर केले आहे. पण त्यापैकी अनेकांना अद्यापही जाहीर केलेले लाभ मिळालेले नाहीत. केंद्र सरकारने जाहीर केलेली विमा कवच मुदत संपलेली असून, ती अद्याप वाढविलेली नाही. याबाबत राज्य सरकारने पाठपुरावा करावा व या कोरोना योद्धांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी आम्ही करीत आहोत.

लॉकडाऊनमुळे रोजगार गमविलेल्या व व्यवसाय बंद असलेल्या सर्वांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी किमान १०,००० रुपये देण्यात यावेत. यापूर्वी आपण जाहीर केलेली मदत तुटपूंजी असून, तीदेखील अद्याप लाभार्थ्यांना मिळालेली नाही.

तसेच नावनोंदणी केलेली असो अथवा नसो अशा घरकामगार, रिक्षावाले, फेरीवाले, छोटे कारागीर, फळ-भाजी विक्रेते व इतर सर्व असंघटीत कामगारांना सरसकट तातडीने व सुचविल्याप्रमाणे आर्थिक मदत करावी. प्रत्यक्षात ही मदत त्यांच्यापर्यंत पोहचेल, याची खात्री करावी. तसेच कोरोना महामारीवर योग्य नियोजन व उपाययोजना होण्यासाठी स्थानिक, जिल्हा व राज्य पातळीवर सर्व राजकीय पक्षांना तसेच स्वयंसेवी संस्था व संघटनांना विश्वासात घेऊन दक्षता समित्या तयार करून, त्यांच्या सूचनांची दखल घ्यावी, अशा मागण्या या पत्राद्वारे राज्य सरकारकडे करण्यात आल्या आहेत.