साप्ताहिक युगांतर

कामगार-शेतकरी, दलित, महिला, विद्यार्थी-युवक यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे..

इस्राईल पॅलेस्टाईन संघर्ष : साम्राज्यवादाचे अपत्य

लेखक : गिरीश फोंडे

(माजी जागतिक उपाध्यक्ष, वर्ल्ड फेडरेशन ऑफ डेमोक्रॅटिक यूथ)

सध्या जागतिक राजकारण दोन विषयांभोवती फिरत आहे ते म्हणजे कोरोना साथ व पॅलेस्टाईन इस्राईल संघर्ष. यामध्ये अगणित संपत्तीचे नुकसान व शेकडो हत्या जग पाहत आहे. यातील अमानवीय दृश्य पाहून पॅलेस्टिनी लोकांच्या भेटी च्या आठवणी जाग्या झाल्याशिवाय राहत नाहीत. वर्ल्ड फेडरेशन ऑफ डेमोक्रॅटिक यूथ या जागतिक संघटनेच्या जनरल कौन्सिलची 35 देशांच्या प्रतिनिधी संघटनांची मिटिंग सन 2015 मध्ये लेबनॉन देशातील राजधानी बेरुत शहरात येथे आयोजित केली होती. या संघटनेचा उपाध्यक्ष या नात्याने मला उपस्थित राहणे गरजेचे होते. मीटिंग संपल्यावर दक्षिण लेबनॉन मधील सीदोन येथील ‘आईन-अल-हिलवे’ या पॅलेस्टाईन शरणार्थी कॅम्पला भेट देण्याच नियोजन होते. त्यानुसार आम्ही मोठ्या सुरक्षा कवचात शरणार्थी कॅम्पला भेटीसाठी निघालो. जगात एकूण नोंदणीकृत 50 लाख पॅलेस्टाईन शरणार्थी आहेत. त्यापैकी 15 लाख हे जॉर्डन, लेबनान रिपब्लिक, गाजा स्ट्रीप, वेस्ट बँक येथील 58 अशा शरणार्थी कॅम्पमध्ये राहतात. शिवाय विस्थापित पॅलेस्टाईन लोक जगातील विविध देशांमध्ये राहणाऱ्या पॅलेस्टाईन लोकांची संख्या असंख्य आहे.

आमच्या स्वागतासाठी पॅलेस्टाईन संघटनांच्या बरोबरच आनंदी झालेली मुले आबालवृद्ध हे वरवर खूष दिसत असले तरी त्यांचे डोळे हे इस्राईल पॅलेस्टाईन संघर्ष अनेक पिढ्या होरपळले ची कहाणी सांगत होते. शरणार्थी लोकांची अवस्था अत्यंत वाईट होती. साफसफाई नव्हती, लोकांना राहण्याची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे गजबजलेल्या वस्तीत लोक राहत होते. एका हॉल मध्ये या ठिकाणी छोटासा भाषणाचा कार्यक्रम आमच्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी मंडळाकडून पाठिंब्याचा भाषणाचा कार्यक्रम पार पडला. याच वेळी मनामध्ये अनेक प्रश्न घोंघावत होते. या लहान मुलांचे बालपण आम्ही मनुष्यांनी हिरावून घेतले आहे. अशी लाखो बालके या युद्धाच्या हिंसेच्या शिकार झाली आहेत.

यावेळी अचानक लोकांची धावपळ व आरडाओरडा ऐकू आली. अनेकजण दडपणाखालचा चेहरा घेऊन स्वतःच्या घराकडे धावत होते. पण शरणार्थीकरिता ही नित्याची बाब होऊन बसली होती. चौकशी केली असता समजले की कोणीतरी शरणार्थी कॅम्पच्या शेजारी गोळीबार केला आहे. शरणार्थीच्या पैकी काही लोक सुरक्षा टीममध्ये होते त्यांच्याकडे विविध प्रकारच्या आधुनिक बंदुका होत्या. आमची भेटीची वेळ संपत आली होती.अशा आठवणी घेऊन आम्ही तेथून 40 जणांच प्रतिनिधी मंडळ निघालो. आमचा काही तासांचा शरणार्थी कॅम्प मधील हा अनुभव होता तर मग हे लोक वर्षानुवर्षे अशा अवस्थेत कसे जगत असतील याची कल्पना करवत नाही.

कोणत्याही धर्मामध्ये एकमेकांच्या द्वेष करा असे शिकवलेले नाही. पण माणूस आपल्या सत्तेची हौस धर्माच्या, संस्कृतीच्या आडून भागवून घेतो. साम्राज्यवादयांनी अनेक वाद हेतुपुरस्सर तयार केले काही तेवत ठेवले, त्या वादात तेल ओतण्याचे काम केले. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे इस्रायल पॅलेस्टाईन वाद होय. ब्रिटिशांनी सुरू केलेला हा वाद त्यात अमेरिका आजतागायत तेल ओतण्याचे काम करत आहे. पहिल्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटिशांनी ऑटोमन साम्राज्य कडून पॅलेस्टाईन कब्जा घेतला. आणि इजराइल च्या अस्तित्वाला पूरक जमीन तयार केली. ज्या पद्धतीने भारताची वसाहत सोडून जाताना त्यांना भारत हे भविष्यात आव्हान होता कामा नये याकरिता त्याचे भारत-पाकिस्तान असे दोन तुकडे करणे ही रणनीती होती. तशीच काही अंशी इजराइल व पॅलेस्टाइन बद्दल राहिली. दुसरा महायुद्धानंतर सत्ता समीकरणे बदलून अमेरिका ही महासत्ता म्हणून उदयास आली. अमेरिकेच्या भविष्यातील महासत्ता टिकवण्यासाठी व अरब देशांच्या साधन संपत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्युव्हरचना नुसार इस्राईलला अमेरिका खतपाणी घालत आलेली आहे व त्याची इस्राईल देखील विविध मार्गाने त्याची परतफेड करत आला आहे.
बेंजमिन नेत्याण्याहू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होऊन सामान्य लोकांनी मोठे आंदोलन उभे केले होते.काही महिन्यांपूर्वी इस्रायल मध्ये झालेल्या राष्ट्रीय निवडणुकीत बेंजमिन नेत्याण्याहू यांच्या लिकुड पक्षाला बहुमत मिळू शकले नाही. त्याकरिता त्यांना धार्मिक कट्टरपंथी पक्षाची गरज लागत आहे. गेल्या दोन वर्षात चार वेळा फेर निवडणुका झाल्या आहेत. पण कोणत्याच पक्ष्यांच्या घडीला बहुमत मिळत नाही.देशांतर्गत राजकारणाच्या या गुंतागुंतीची गरज म्हणून बेंजमिन नेटण्याहू पॅलेस्टाईन वर हल्ले करत आहेत.

अभ्यासकांच्या मते, इस्रायलचा प्राचीन इतिहास हिब्रू बायबल मधून कळतो. त्यामधील मजकूरानुसार, इस्त्राईलची उत्पत्ती अब्राहम यांच्या कडून झाली, ज्यांना यहुदी धर्म (त्याचा मुलगा इसहाक द्वारे) आणि इस्लाम (त्याचा मुलगा इश्माएल मार्गे) या दोघांचा पिता मानले जाते. अब्राहमच्या वंशजांना इजिप्शियन लोकांनी शेकडो वर्षे कनानमध्ये स्थायिक होण्यापूर्वी गुलाम म्हणून ठेवले असे मानले जात होते, जे अंदाजे आधुनिक काळातील इस्राईलचा भाग आहे. इस्रायल हा शब्द अब्राहमचा नातू याकूब याच्याकडून आला आहे, ज्याला बायबलमध्ये हिब्रू देवाने “ इस्राईल” असे नाव दिले.

राजा डेव्हिडने सुमारे इ. स. पूर्व 1000 या प्रदेशावर राज्य केले. नंतर त्याचा मुलगा सोलोमन राजा बनला व त्याने प्राचीन जेरूसलेममध्ये पहिले पवित्र मंदिर बांधले. सुमारे इ. स.पूर्वी 931मध्ये हे राज्य दोन राज्यात विभागला गेला: उत्तरेकडील इस्राईल आणि दक्षिणेस यहुदी इ.स.पू. 722 च्या सुमारास असीरियन लोकांनी उत्तरेकडील इस्राईल राज्यावर आक्रमण करून ते उद्ध्वस्त केले . इ.स. पू. 568 मध्ये, बॅबिलोनी लोकांनी जेरूसलेम जिंकले आणि पहिले मंदिर नष्ट केले, जे इसवी सन पूर्व 516 मध्ये दुसऱ्यांदा बांधले गेले.

पुढच्या कित्येक शतकांमध्ये, आधुनिक काळातील इस्त्राईलला पारसी, ग्रीक, रोमन, अरब, फाटिमिड्स, सेल्जुक तुर्क, धर्मयोद्धे, इजिप्शियन, मामेलुक्स, इस्लामी आणि इतर अशा अनेक गटांनी जिंकले आणि त्यांच्यावर राज्य केले. इ.स.1517 ते 1917 पर्यंत इस्रायल सहित बहुतांश मध्यपूर्व भागावर ऑटोमन साम्राज्याची सत्ता होती. सन 1918 मध्ये मित्र राष्ट्रांच्या विजयाबरोबरच पहिले महायुद्ध संपुष्टात आले तेव्हा पॅलेस्टाईन( म्हणजे सध्याचे इस्राईल, पॅलेस्टाईन व जॉर्डन) वरचे नियंत्रण ऑटोमन साम्राज्य कडून ब्रिटिश यांच्याकडे आले. सन 1922 मध्ये “लीग ऑफ नेशन्सने” बॉलफोर घोषणापत्र आणि पॅलेस्टाईनवरील ब्रिटिश हुकूम मंजूर केला. अरब लोकांनी बालफोरच्या घोषणेला कडाडून विरोध दर्शविला, कारण ज्यूंच्या मातृभूमीचा अर्थ अरब पॅलेस्टाईनने त्यांच्या अधिपत्याखाली राहण्याचा होता. दुसरे महायुद्ध संपून 1948 मध्ये इसराइल स्वतंत्र राष्ट्र निर्मितीपर्यंत ब्रिटीशांचे पॅलेस्टाईनवर नियंत्रण होते.

पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीला ज्यू लोकांची लोकसंख्या 1 कोटी 67 लाखांच्या घरात पोहोचली म्हणजे त्यावेळची लोकसंख्या पाहता 0.7% टक्के ज्यू होते. 2018 मध्ये ही लोकसंख्या 1 कोटी 40 लाख ते 1 कोटी 80 लाख या दरम्यान पोहोचली आहे. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20 व्या शतकाच्या पूर्वाधार्थ, ज्यू मध्ये झिओनिझम ही धार्मिक आणि राजकीय चळवळ उदयास आली.

पॅलेस्टाईनमध्ये ज्यूंना मातृभूमीची पुनर्स्थापना करण्याच्या उद्देशाने जगभरातील मोठ्या संख्येने ज्यू लोक स्थलांतरीत होऊन पॅलेस्टाईनमध्ये (सध्याचा इजराइल) स्थायिक झाले आणि त्यांनी तेथे वस्ती बांधल्या. सन 1882 ते 1903 दरम्यान सुमारे 35 हजार ज्यू पॅलेस्टाईनमध्ये पुनर्स्थायिक झाले. पुन्हा सन 1904 ते 1914 दरम्यान आणखी 40 हजार ज्यू लोक तिथे स्थायिक झाले. ज्यू विरोधी नाझीवादाच्या उदयानंतर छळाच्या भीतीने युरोप आणि इतरत्र राहणाऱ्या ज्यू लोकांनी पॅलेस्टाईनमध्ये आश्रय घेतला. होलोकॉस्ट व दुसरे महायुद्ध संपल्यानंतर झिओनिस्ट चळवळीतील सदस्यांनी प्रामुख्याने स्वतंत्र ज्यू राज्य निर्माण करण्यावर भर दिला. सन 1940 मध्ये भारतात 20 हजार ज्यू लोक होते इस्रायलच्या स्थापनेनंतर ती कमी होऊन 2001 च्या जनगणनेनुसार ती 4650 राहिली.

सन 1947 मध्ये पॅलेस्टाईनला ज्यू आणि अरब राज्यात विभाजित करण्याच्या योजनेला संयुक्त राष्ट्राने मान्यता दिली, पण अरबांनी ती नाकारली. मे 1948 मध्ये, ज्यू राष्ट्राचा प्रमुख डेव्हिड बेन-गुरियन पंतप्रधान म्हणून इस्रायलला अधिकृतपणे स्वतंत्र राज्य म्हणून घोषित करण्यात आले. त्याच वर्षी स्वतंत्र इस्त्राईलच्या घोषणेनंतर इजिप्त, जॉर्डन, इराक, सीरिया आणि लेबेनॉन या पाच अरब राष्ट्रांनी त्वरित या प्रदेशात आक्रमण केले. संपूर्ण इस्रायलमध्ये गृहयुद्ध सुरू झाले, परंतु सन 1949 मध्ये युद्धबंदीचा करार झाला. तात्पुरत्या शस्त्रास्त्र कराराचा भाग म्हणून वेस्ट बँक जॉर्डनचा भाग बनला आणि गाझा पट्टी इजिप्शियन प्रदेश बनली.

सन 1967 मध्ये इस्रायलने इजिप्त, जॉर्डन आणि सिरियाचा सहा दिवसांत पराभव केला. या संक्षिप्त युद्धानंतर इस्रायलने गाझा पट्टी, सिनाई द्वीप कल्प, वेस्ट बँक आणि गोलन हाइट्स ताब्यात घेतली. हे भाग इस्राईल च्या ताब्यात राहिले. गाझा आणि वेस्ट बँकच्या इस्त्रायली कब्जामुळे 1987 मध्ये पॅलेस्टिनी उठाव झाला आणि त्यात शेकडो मृत्युमुखी पडले. ओस्लो पीस अ‍ॅकार्ड म्हणून ओळखल्या जाणार्‍या शांती प्रक्रियेने हा प्रयत्न संपुष्टात आला. यानंतर पॅलेस्टाईन प्राधिकरणाने इस्राईलमधील काही प्रांत ताब्यात घेतला. 1997 मध्ये, इस्त्रायली सैन्याने वेस्ट बँकच्या काही भागातून माघार घेतली. सन 2000 मध्ये पॅलेस्टाईननी इस्त्रायलींवर आत्मघातकी बॉम्ब आणि इतर हल्ले सुरू केले. इस्राईलने 2005 च्या अखेरीस गाझा पट्टीवरुन सर्व सैन्य आणि ज्यू वसाहती हटवण्याची योजना जाहीर केली. सन 2006 मध्ये पॅलेस्टाईनची सत्ता स्थापणाऱ्या सुन्नी इस्लामी अतिरेकी गट हमासबरोबर इस्रायलच्या संघर्षात वारंवार हिंसाचार घडला. तसेच दोघांमध्ये काही मोठे संघर्ष सन 2008, 2012 आणि 2014 मध्ये झाले.

इस्त्राईल पॅलेस्टाईनला राज्य म्हणून अधिकृतपणे मान्यता देत नाही, मात्र संयुक्त राष्ट्रसंघाच्या 135 हून अधिक सदस्य यांनी पाठिंबा दिला आहे. आता सुरू असलेल्या लढाईमध्ये बेंजामिन नेत्यानाहू यांनी 25 देशांच्या आभार मानले आहेत याचा अर्थ केवळ 25 देशांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.

जेरुसलेम मध्ये मुस्लिम, ख्रिश्चन व यहुदी धर्माची चार पवित्र ठिकाण आहेत. पहिले म्हणजे ख्रिश्चनांसाठी सेप्लकर चर्च. बहुतांश ख्रिस्ती परंपरेनुसार येशूला इथेच गोल गोठा वर किंवा कॅलरी या टेकडीवर वधस्तंभला बांधण्यात आलं. येशूचे थडगं या चर्चमध्ये चाहे. दुसरा म्हणजे मुस्लिमांसाठी मस्जिद. मुस्लिमांमध्ये अल-हरम-अल-शरीफ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात एका पठारावर दगडी घुमट आणि अल अक्सा मस्जिद आहे. तिसरं म्हणजे जू लोकांसाठी पवित्र भिंत. ज्यू धर्मीयांचे स्थळ हे कोटल किंवा पश्चिमी भिंत म्हणून ओळखल जात. जू लोक असं मानतात की हे स्थळ म्हणजे पायाचा तो जग दगड जिथून जगाची निर्मिती झाली होती जिथून अब्राहम यांनी मुलगा इसाकचा त्याग करण्याची तयारी केली होती. चौथा म्हणजे आर्मेनियन चर्च. हे देखील आर्मेनियन ख्रिश्चनांसाठी साठी पवित्र स्थळ आहे.

एकाच शहरामध्ये अशा रीतीने विविध धर्माची अत्यंत महत्त्वाची पवित्र प्रार्थना स्थळे असणे हा कमजोर दुवा नसून तो पूर्ण जगाला शांतता संदेश देण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. जेरुसलेम शहरामध्ये जर सर्वांनी शांतता प्रस्थापित केली व सर्वांनीच सह अस्तित्व गुण्या गोविंदाने मान्य केलं तर याचा आधार घेत जगामध्ये इतर ठिकाणी शांतता स्थापित करता येईल. पण हा खेळ केवळ धर्म, श्रद्धा यांचा नसून हा खेळ साम्राज्यवादाचा, वर्चस्ववादाचा, प्रादेशिक अर्थकारणाचा व सत्तेचा आहे त्यामुळे नजीकच्या काळात तोडगा दिसत नाही.