साप्ताहिक युगांतर

कामगार-शेतकरी, दलित, महिला, विद्यार्थी-युवक यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे..

राकेश वानखेडे यांच्या ‘गिनिपिग’ कादंबरीचे ११ जुलैला प्रकाशन

लेखक आसाराम लोमटे व समीक्षक डॉ. महेंद्र कदम यांच्या हस्ते प्रकाशन

नाशिक : नाशिकचे सुपुत्र राकेश वानखेडे यांच्या ‘पुरोगामी’ कादंबरीच्या यशानंतर ‘गिनिपिग’ ही नवी कादंबरी प्रकाशनासाठी सज्ज झाली आहे. रविवारी दिनांक ११ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता साहित्य अकादमी विजेते सुप्रसिद्ध लेखक आसाराम लोमटे (परभणी) तथा समीक्षक व कादंबरीकार प्राचार्य डॉ. महेंद्र कदम (सोलापूर) यांच्या हस्ते या कादंबरीचे प्रकाशन ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

 

प्रगतिशील लेखक संघाचे राज्य सरचिटणीस असलेल्या लेखक राकेश वानखेडे यांची ‘पुरोगामी’ ही कादंबरी नुकतीच मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झालेली आहे. तसेच तिला अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. ‘पुरोगामी’ कादंबरीनंतर पुढे काय, याबाबत वाचकांमध्ये आतुरता होती. ११ जुलै रोजी प्रकाशित होणाऱ्या ‘गिनिपिग’ या कादंबरीचेदेखील वाचक, जाणकार, अभ्यासक तथा समीक्षक उत्स्फुर्तपणे स्वागत करतील, असा विश्वास श्री. वानखेडे यांनी व्यक्त केला आहे.

जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत सामान्य माणसाचे होणारे वस्तूकरण या विषयाला वाचा फोडणारी कादंबरी

जागतिकीकरण तसेच खाजगीकरण या प्रक्रियेमध्ये सामान्य माणसाचे होणारे वस्तूकरण या विषयाला वाचा फोडणारी ही कादंबरी आहे. जागतिकीकरणाच्या ३० वर्षाच्या संक्रमण अवस्थेनंतरचा लेखाजोखा किंवा सिंहावलोकन मांडणाऱ्या या महत्त्वपूर्ण कादंबरीचे प्रकाशन समारंभास ऑनलाइन पद्धतीने होणार असून, ब्लॅक इंक मिडिया व प्रगतिशील लेखक संघ, महाराष्ट्र या फेसबुक पेजवर या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. वाचकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज प्रबोधन संस्था नाशिक तसेच प्रगतिशील लेखक संघ शाखा नाशिकचे अध्यक्ष कवी प्रमोद अहिरे, सचिव प्रल्हाद पवार यांच्यावतीने  करण्यात आले आहे.