साप्ताहिक युगांतर

कामगार-शेतकरी, दलित, महिला, विद्यार्थी-युवक यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे..

औरंगाबाद येथे १८ व १९ डिसेंबरला राष्ट्रीय दलित अधिकार अधिवेशन

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. डी. राजा, कॉ. जानकी पासवान यांच्यासह देशभरातून प्रतिनिधी येणार

औरंगाबाद : भारतीय शेतमजूर युनियन, महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन, अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने १८ व १९ डिसेंबर २०२१ रोजी औरंगाबाद येथे राष्ट्रीय दलित अधिकार अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे उद्‌घाटन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कॉ. डी. राजा यांच्या हस्ते होणार असून, अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाचे राष्ट्रीय निमंत्रक कॉ. जानकी पासवान अध्यक्षस्थानी असतील. या अधिवेशनाला देशभरातील शेकडो प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती कॉ. प्रा. राम बाहेती यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

उद्‌घाटनप्रसंगी भारतीय शेतमजूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष पेरिया सामी (तामिळनाडू), महासचिव कॉ. गुलजारसिंग गोरिया, ज्येष्ठ नेते कॉ. मनोहर टाकसाळ, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव मंडळ सदस्य कॉ. डॉ. भालचंद्र कानगो, राज्यसचिव कॉ. तुकाराम भस्मे, अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाचे राज्य निमंत्रक कॉ. शिवकुमार गणवीर, लालबावटा शेतमजूर युनियनचे राज्याध्यक्ष कॉ. नामदेव चव्हाण आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 

समता मिरवणुकीने प्रारंभ

उद्‌घाटन सत्र सर्वांसाठी खुले राहणार असून, समता मिरवणुकीने याची सुरुवात होईल. समता मिरवणुकीस व उद्‌घाटनाच्या खुल्या सत्रास आंबेडकरवादी, डाव्या, पुरोगामी, धर्मनिरपेक्ष पक्ष – संघटनाच्या कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच परिसंवाद, पुस्तिका, स्मरणिक, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा अशा कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येणार आहे.

 

बुद्धप्रिय कबीर नगर

औरंगाबाद येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणाऱ्या या अधिवेशन स्थळास औरंगाबादेतील दलित अत्याचारविरोधी संघर्ष समितीचे धडाडीचे कार्यकर्ते दिवंगत बुद्धप्रिय कबीर यांच्या स्मरणार्थ “बुद्धप्रिय कबीर नगर’ असे नाव देण्यात आले आहे.