साप्ताहिक युगांतर

कामगार-शेतकरी, दलित, महिला, विद्यार्थी-युवक यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे..

विद्रोही साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन

नाशिक : येथे ४ व ५ डिसेंबर रोजी संविधान सन्मानार्थ १५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन ‘मविप्र’च्या सरचिटणीस निलिमाताई पवार यांच्या हस्ते  के.टी.एच.एम. महाविद्यालयात करण्यात आले. औरंगाबादचे चित्रकार राजानंद सुरडकर यांनी हे बोधचिन्ह तयार केले आहे.

याप्रसंगी संमेलनाचे स्वागताध्यक्ष शशिकांत उन्हवणे, मुख्य संयोजक कॉ. राजू देसले, मुख्य विश्वस्त अॅड. मनिष बसस्ते, प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कॉ. किशोर ढमाले, गणेश उन्हवणे, गुलाम शेख, कार्याध्यक्ष प्रभाकर धात्रक आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मराठा विद्या प्रसारक संस्थेला छत्रपती शाहू महाराजांनी भेट दिली होती. या भेटीला १०१ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सत्यशोधक चळवळीच्या  विचारांचे हे संविधान सन्मानार्थ १५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे होत आहे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी मराठा विद्या प्रसारक संस्था सर्वतोपरी मदत करील, असे निलिमाताई पवार यांनी जाहीर केले.

किशोर ढमाले यांनी बोधचिन्हाचा अर्थ सांगितला. कॉ. राजू देसले यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. नारायण पाटील यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते साराभाई वेळूंजकर, व्ही. टी. जाधव, प्रल्हाद मिस्त्री, चंद्रकांत भालेराव, पी. कुमार धनविजय, अर्जुन बागुल, रविकांत शार्दुल, प्रल्हाद मिस्त्री, जयंत विजयपुष्प, पंढरीनाथ पगारे, प्रकाश खळे, राकेश वानखेडे, शिवदास म्हसदे, यशवंत बागुल, तल्हा शेख व संस्थेचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक वर्ग तसेच संमेलनाच्या संयोजन समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बोधचिन्हाचा अर्थ

संविधानाने दिलेली मूल्यव्यवस्था प्रत्यक्षात आणण्यासाठी विद्रोही  मराठी साहित्य संमेलन होत आहे. हे  साहित्य संमेलन प्रतिक्रियावादी नाही. हाच खरा मूळ प्रवाह आहे. क्रांतिसूर्य जोतिबा फुले, महासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज या सूर्यकुळांनी  या मूळ प्रवाहाला उजागर केले. म्हणून या बोधचिन्हात प्रतिकात्मक सूर्य दाखवला आहे. लेखणीतून प्रबुद्ध पिंपळपान उगवले आहे. महाकवी वामनदादा कर्डक, आंबेडकरी साहित्याचे भाष्यकार बाबुराव बागुल यांचे पिंपळपान प्रतिक आहे. लेखणीत आदिवासीं उलगुलानसाठी एक महिला नगारा वाजवत आहे. नांगर आहे आणि या नांगराने गुलामीच्या बेड्या तोडून टाकल्या आहेत. शेतकरी आंदोलन व साहित्य याचे ते प्रतीक आहे. या बोधचिन्हात आमचा सूर्यसन्मुख प्रवास ध्वनित होतो.