साप्ताहिक युगांतर

कामगार-शेतकरी, दलित, महिला, विद्यार्थी-युवक यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे..

कोल्हापुरात गुरुवारी दलित अधिकार संमेलन

प्रा. डॉ. शरद गायकवाड प्रमुख वक्ते; शाहू स्मारक भवन येथे आयोजन

कोल्हापूर : भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि अखिल भारतीय शेतमजूर युनियनच्या पुढाकाराने १८ व १९ डिसेंबर रोजी राष्ट्रीय अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन होत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे गुरुवारी (ता. १६) दुपारी २.३० वाजता दलित अधिकार संमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कोल्हापूर जिल्हासचिव कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कॉ. कांबळे म्हणाले, की देशपातळीवर दलित, महिला, आदिवासींच्या शोषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. संसदेमध्ये दररोज सत्ताधारी पक्षांच्यावतीने घटनेतील दलितांच्या अधिकारावर गंडातर आणले जाते. ज्या दलित, कष्टकऱ्यांच्यासाठी घटनेची निर्मिती झाली आहे. तिला दररोज पायदळी तुडवले जात आहे. या पार्श्वभूमीवर दलित अधिकार शाबूत ठेवण्यासाठी, दलित व श्रमिकांची एकजूट भक्कम झाल्याशिवाय दलित अधिकार सुरक्षित राहू शकत नाही.

सध्याच्या राजकारणात मताच्या राजकारणासाठी, जाती बळकट करण्याच्यादृष्टीने पावले उचलली जात आहेत. आरक्षणाचा बागूलबुवा करून जातीचे संघटन घट्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार पूर्णपणे बाजूला करण्याचा प्रयत्न सुरु आहे. जातीअंताची लढाई बाजूला पडत आहे आणि पर्यायाने जाती बळकट करण्यासाठी षडयंत्र रचली जात आहेत. नव्या बदलत्या जगात जात – धर्माचे उजवे राजकारण बाजूला सारून नव्या संकल्पनांचा उदय झाला पाहीजे. पण त्याऐवजी जातदांडगे, धर्मलांडगे तयार होताना दिसत आहेत.

नव्या दलित संकल्पनेत सर्व दबलेल्या जाती, आदिवासी समूह, स्त्रिया आणि असंघटित क्षेत्रातले कामगार, शेतमजूर यांची एकजूट घडवून आणली, तरच जातीअंताचे राजकारण पुढे जाईल. याचा अर्थ दलित – श्रमिकांच्या एकजूटीशिवाय दलितांना घटनेने दिलेले अधिकार सुरक्षित ठेवता येणार नाहीत. म्हणूनच भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय शेतमजूर युनियन (BKMU) यांच्या पुढाकाराने औरंगाबाद महाराष्ट्र येथे अखिल भारतीय दलित अधिकार अधिवेशन होत आहे.

या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील दलित व श्रमिकांच्यावतीने दि. १६ डिसेंबर रोजी शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे दलित अधिकार संमेलन आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी सामाजिक चळवळींचे अभ्यासक प्रा. डॉ. शरद गायकवाड मार्गदर्शन करणार असून, अध्यक्षस्थानी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव कॉ. नामदेव गावडे असणार आहेत.

या संमेलनात कोल्हापूर जिल्हयातील दलित व श्रमिकांमध्ये जातीअंताची लढाई करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कॉ. कांबळे यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला भाकपचे जिल्हा सहसचिव कॉ. दिनकर सूर्यवंशी, कॉ. गिरीश फोंडे, कॉ. सम्राट मोरे, शहर सचिव कॉ. रघुनाथ कांबळे उपस्थित होते.