साप्ताहिक युगांतर

कामगार-शेतकरी, दलित, महिला, विद्यार्थी-युवक यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे..

शहीद शेतकरी सीताबाई तडवी यांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत द्या..

नाशिक येथील शेतकरी, कामगार, विद्यार्थी संघटनांची राज्य सरकारकडे मागणी

नाशिक : येथील हुतात्मा स्मारकमध्ये शेतकरी, कामगार व विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे साखर भरवत दिल्लीच्या सीमेवरील यशस्वी शेतकरी आंदोलनाचा विजयोत्सव साजरा केला. या आंदोलनात नंदूरबार येथील महिला शेतकरी सीताराम तडवी या शहिद झाल्या. याची दखल घेत महाराष्ट्र राज्य सरकारने शहीद तडवी यांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सचिव कॉ. राजू देसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत दीर्घकाळ चाललेल्या शेतकरी आंदोलनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जनआंदोलनाच्या बळावर शेतकऱ्यांनी केंद्रातील मग्रूर मोदी सरकारला झुकायला भाग पाडले. हा शेतकरी आंदोलनाचा आणि मजबूत लोकशाहीचा विजय असल्याचे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.

दरम्यान, केंद्राने कृषी कायदे मागे घेतले असले तरी कामगार कायदे मागे घेतलेले नाही. केंद्राचे अन्यायी कामगार कायदे महाराष्ट्र सरकार राज्यात लागू करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. याविरोधात देश, राज्य व स्थानिक पातळीवर कामगार, शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन तीव्र आंदोलन करण्याची गरज आहे. या संदर्भात नाशिक जिल्ह्यातील कामगार संघटना व शेतकरी संघटना यांची लवकरच एकत्र बैठक घेण्यात येणार आहे.

यावेळी बँक कर्मचारी संपास पाठिंबा देण्यात आला. तसेच एस टी कर्मचारी आंदोलनावर शासनाने त्वरित मार्ग काढावा, असे आवाहन करण्यात आले.

किसान सभेचे नेते सुनील मालुसरे, कुमार औरंगाबादकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. सिटूचे मुकुंद रानडे, किसान सभा नाशिक तालुकाध्यक्ष नामदेव बोराडे, विठ्ठल घुले, निवृत्ती कसबे, प्रभाकर वायचले, अखिल भारतीय नौजवान सभेचे भीमा पाटील, छत्रभारतीचे देविदास हजारे, ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशन च्लया प्राजक्ता कापडणे, आयटकचे व्ही. डी. धनवटे, अरुण म्हस्के आदी उपस्थित होते.