साप्ताहिक युगांतर

कामगार-शेतकरी, दलित, महिला, विद्यार्थी-युवक यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे..

दलितांचा देशव्यापी मुक्तिलढा उभारण्याचा निर्धार

नाशिक येथे आमदार कॉ. सूर्यकांत पासवान व कॉ. महादेव खुडे यांचा सत्कार

नाशिक : भारतीय संविधानाला भाजपा सरकारच्या काळात धोका निर्माण झाला असून, समाजातील इतर घटकांसोबतच भारतीय संविधान हे दलितांसाठी संरक्षक कवच आहे. त्यामुळे देश वाचवायचा असेल तर संविधान वाचले पाहिजे. त्यासाठी दलित अधिकार आंदोलन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन बिहार येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आमदार आणि दलित अधिकार आंदोलनाचे नूतन राष्ट्रीय सचिव सूर्यकांत पासवान यांनी केले.

नाशिक येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनसंघटना व पुरोगामी संघटनांच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड राजू नाईक होते. तसेच आयटकचे नेते व्ही. डी. धनवटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी विविध संघटनांच्यावतीने राष्ट्रीय सचिव म्हणून निवड झाल्याबद्दल आ. पासवान आणि  राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नाशिक येथील कॉम्रेड महादेव खुडे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना उपाध्यक्ष कॉ. खुडे यांनी मोदी सरकारच्या काळात दलित अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली असल्याचे सांगितले. दलितांचे सामाजिक, आर्थिक प्रश्न, शैक्षणिक प्रश्न घेऊन सर्व समविचारी संघटनांना घेऊन दलितांचा देशव्यापी मुक्तिलढा उभारण्याचे औरंगाबाद येथे दिनांक १८-१९ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या अधिवेशनात ठरले असल्याचे त्यांनी सांगितले.

ए.आय.एस.एफ.चे राज्याध्यक्ष विलास देवांग यांनी स्वागत केले. इप्टाचे कार्यकर्ते तल्हा शेख यांनी सूत्रसंचालन केले. अखिल भारतीय नौजवान सभेचे कॉम्रेड भीमा पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. रामदास भोंग,मनोहर पगारे, जयेश विजयपुष्प, प्राजक्ता कापडणे, कैलास मोरे, राहुल अढांगळे, शरद आहिरे, नाना सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले. नाशिक शहरातील डाव्या, फुले-आंबेडकरी पुरोगामी प्रवाहातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.