साप्ताहिक युगांतर

कामगार-शेतकरी, दलित, महिला, विद्यार्थी-युवक यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे..

लढाऊ कामगार नेत्या कॉम्रेड सुशीला यादव यांना धम्मदीप जीवन गौरव पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, कष्टकरी महिलांच्या चळवळींच्या आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या कॉ. सुशीला यादव यांना यावर्षीच्या धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टचा मानाचा धम्मदीप जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

रविवार दि. 30 जानेवारी 2022 रोजी कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे होणाऱ्या चौथ्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विजया कांबळे यांच्या हस्ते कॉ. सुशीला यादव यांना धम्मदीप जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

धम्मदीप जीवन गौरव पुरस्कार निवडीचे पत्र धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा व संमेलनाच्या निमंत्रक प्रा. करुणा मिणचेकर यांनी कॉ. सुशीला यादव यांना दिले आहे.

कॉ. सुशीला यादव या गली 40-45 वर्षे महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या रस्त्यावरच्या कार्यकर्त्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. कॉ. सुशीला यादव या सध्या मोलकरीण संघटनेच्या महाराष्ट्र राजाध्यक्षा, शेतमजूर संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा तसेच परिचारिका संघटनेच्या राजाध्यक्षा तर आयटकच्या राज्य सदस्य म्हणून काम करतात. महिलांच्या विविध प्रश्नांसंबंधी त्यांनी सतत न्यायिक भूमिका घेण्याचे काम केले आहे. कष्टकरी चळवळीचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या त्या जवळच्या सहकारी कार्यकर्त्या म्हणूनही महाराष्ट्रभर ओळखल्या जातात. कॉ. सुशीला यादव यांनी आपले सारे आयुष्य सामाजिक कार्यासाठी खर्ची पाडले आहे. त्यांच्या या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊनच त्यांना यावर्षीचा धम्मदीप जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्याचे ठरविले आहे.