साप्ताहिक युगांतर

कामगार-शेतकरी, दलित, महिला, विद्यार्थी-युवक यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे..

लोकराजा आणि एक झपाटलेला कॉम्रेड

“अरे राहुल उद्या आपल्याला हुपरीला जायचं आहे तुझी पुस्तकांची बॅग तयार ठेव..”

अण्णा मला त्यादिवशी निरोप देऊन घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी हुपरी इथं शाहू महाराजांवर अण्णा व्याख्यान देणार होते ; आणि त्यासाठी मला पुस्तकं बरोबर घेण्याची सूचना मिळाली होती. लोकवाङ्मय गृहची पूर्ण जबाबदारी तेव्हा अण्णा बघत होते. आणि तेव्हा व्याख्यानावेळी पुस्तकं सोबत नेण्याची जबाबदारी अण्णांनी माझ्यावर सोपवली होती. अण्णा …कॉम्रेड गोविंद पानसरे…महाराष्ट्र शासनाने 2022 हे वर्ष राजर्षी शाहू महाराज स्मृतिशताब्दी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. त्यानिमित्त शाहू महाराज आचरणात जगलेल्या एका योद्ध्याची आठवण. कॉम्रेड गोविंद पानसरे महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीचे पितामह. शाहू महाराजांना आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने जगलेला एक तळमळीचा आणि तत्वांशी एकनिष्ठ योद्धा.

अण्णांनी शाहू महाराजांवर राजर्षी शाहू वसा आणि वारसा हे पुस्तक लिहलं होतं. लोकांनी या पुस्तकावर खूप प्रेम केलं. पण अण्णा पुस्तक लिहून थांबणारे नव्हते. अण्णांनी राजर्षी छ.शाहू महाराजांवर 200 व्याख्यानं देण्याचा संकल्प केला होता आणि तो पूर्णसुद्धा केला होता. मी स्वतःला भाग्यवान समजतो की त्यातल्या कित्येक व्याख्यानांना मला अण्णांसोबत जाता आलं. लोकांनी नुसती व्याख्यानं ऐकू नये तर महापुरुषांचे विचार पुस्तकं वाचून समजून घ्यावेत असा अण्णांचा आग्रह असायचा. आणि त्यासाठी पुस्तकं व्याख्यानाच्या ठिकाणी घेऊन कुणीतरी तरुण कार्यकर्त्यांनं यावं असं अण्णा सुचवायचे.

मी तेव्हा विद्यार्थी चळवळीत काम करत होतो. मला अजूनही ती सकाळ आठवते. अण्णांचा निरोप मिळाला त्याच्या दुसऱ्या दिवशी मी ठरलेल्या वेळेत सागर माळ इथल्या त्यांच्या घरी गेलो. पुस्तकांची बॅग तयारच होती आणि त्यात राजर्षी शाहू वसा आणि वारसा आणि शिवाजी कोण होता? ही अण्णांची प्रचंड वाचली जाणारी पुस्तकं मी घेतली होती. अण्णा सकाळी तयार होऊन बसले होते…कुणीतरी ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांना पेपर वाचून दाखवायला रोज यायचे. कारण अण्णांची दृष्टी थोडी कमजोर झाली होती. पण ग्रंथ आणि वृत्तपत्र वाचनात त्यांचा कधीही खंड पडायचा नाही.

“अरे काही खाल्लयस का? आपुलकीचा प्रश्न आला..
“नाही अण्णा चहा घेतलाय फक्त !.. मी सांगितलं.

त्यावर अण्णा म्हणाले “असुदे आपण मॅगी खाऊ”. माझ्याकडे बघून अण्णा हसले आणि आम्ही मॅगी खाऊ लागलो. थोड्या वेळात हुपरीच्या शेंडुरे कॉलेजची गाडी आम्हाला न्यायला आली. एक प्राध्यापक महोदय मी आणि अण्णा असे तिघेजण कॉलेजवर पोहोचलो. प्रा.डॉ टी.एस पाटील तेव्हा त्या कॉलेजचे प्राचार्य होते. मी पुस्तकं बाहेर लावली ,आणि जमलेल्या गर्दीकडे माझं लक्ष गेलं. व्याख्यान ऐकायला खूपच गर्दी झाली होती. अण्णांचे व्याख्यान म्हणजे तरुणांसाठी मोठीच वैचारिक मेजवानी असायची. अत्यंत सोपी भाषा, मनोरंजक शैली, गोष्टी आणि महापुरुषांची चरित्रं लोकांना समजावून सांगण्याची टोकाची तळमळ हे सगळं अण्णांच्या व्याख्यानाचं सार असायचं. व्याख्यान संपलं आणि अण्णांच्या भोवती विद्यार्थी शिक्षकांचा गराडा दिसला. व्याख्यानाच्या शेवटी अण्णा सांगायचे.

“तो तिथं राहूल बसलाय त्याच्याकडे खूप चांगली पुस्तकं आहेत. स्वस्त आहेत , जरूर घ्या”.
‘शिवाजी कोण होता? आणि राजर्षी ‘शाहू वसा आणि वारसा’ ही पुस्तकं खूप वाचली जातात हा माझा अनुभव पहिला नव्हता. कॉ. अवि पानसरे व्याख्यानमालेत येणारे लोक ही पुस्तकं आवर्जून वाचतात हे आम्ही बघितलं होतं. अवि पानसरे व्याख्यानमालेत ही पुस्तकं जास्त जातात यांचं मला आणि माझा तेव्हाचा सहकारी सूरज रसाळ याला खूप कौतुक वाटायचं. अण्णांची व्याख्यानं तरुण वर्गात खूपच लोकप्रिय झाली होती.

अण्णा माझ्यासारख्या कित्येक कार्यकर्त्यांसाठी योद्धाच होते. हाफ पांढरा शर्ट, हातात घड्याळ आणि डोळ्यावर चष्मा असा साधा पोषाख असलेला हा योद्धा आपल्या भात्यात कित्येक प्रभावी बाण घेऊन लढला. हे बाण विषमता, ढोंगी बुवाबाजी, आणि गोरगरिबांच्या शत्रूसाठी असायचे. न्यायाच्या राज्यासाठी होते. शाहू महाराज अण्णांनी नुसते व्याख्यानात मांडले नाहीत तर तो विचार ते अक्षरशः जगले. जातिवादाचे विरोधक असणाऱ्या अण्णांनी आपल्या मुलीचा आंतरजातीय विवाह लावून दिला. आपल्या बहिणीचा आंतरजातीय विवाह लावून देणारे शाहू महाराज अण्णा खऱ्या अर्थाने जगले होते असचं माझ्यासारख्या कित्येक जणांचं आजही मत आहे.

शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार करणारा राजा अण्णांनी मांडला. शाहू महाराजांच्या आरक्षणाच्या भूमिकेवर अण्णा खूपच प्रभावी बोलायचे. अण्णांचं सगळं आयुष्य मोलकरीण, कामगार, शेतकरी आणि परिघाबाहेरच्या माणसांच्या जगण्यात विवेकाचा प्रकाश पडावा म्हणून संघर्ष करण्यात गेलं. अण्णांनी शाहू महाराजांच्या विचारांची आणि कामाची आजची प्रस्तुतता मांडली. अन्याय दिसला की मूठ आवळा हेच अण्णांच्या शिकवलेल्या संघर्षाचं सूत्र होतं. शाहू महाराज म्हणजे राज्यकर्ता कसा असावा? याचा आदर्श वस्तुपाठ होता, अण्णांनी हे शिकवलं.

पन्हाळ्यावर कार्यकर्त्यांच्या शिबिरात “आम्ही कोण आम्ही कोण” हे गाणं गाताना मला वयाची 80 वर्षे ओलांडलेला निधड्या छातीचा योद्धा बघायला मिळाला होता. अण्णा तुमच्या उक्ती आणि कृतीत कधीही फरक नाही दिसला. शेतकऱ्यांचा हात ऊस गाळताना यंत्रात अडकून तुटायचा. यावर शाहू महाराजांनी सुरक्षित यंत्राचा शोध लावणाऱ्या व्यक्तीला बक्षीस जाहीर केले होते. ही गोष्ट अण्णा इतकी तल्लीन होऊन सांगायचे की ते ऐकून लोकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहायचे. अण्णा शाहू महाराज ज्या तळमळीने तुम्ही मांडत होतात ती तळमळ अजूनही मला कुणात दिसत नाही. राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्व सध्या सुरुय.

खरंतर ते महाराष्ट्रासाठी आजन्म आहेच. या निमित्तानं तुमची आठवण झाली. दुसरी कुणाची यायला हवी होती?? खूप लिहायचं होतं पण आता हातही थरथरतायत आणि डोळेही पाणावलेत..थांबतो आता…

– राहुल सडोलीकर, कोल्हापूर