मुंबई : मराठीतील सुप्रसिद्ध कवी सतीश काळसेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मुंबईत २३ व २४ जुलै २०२२ रोजी सतीश काळसेकर स्मृतिजागराचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने विविध साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कवी सतीश काळसेकर स्मृती समिती आणि यशवंतराव चव्हाण सेंटरच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांतर्गत २३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता ‘पुस्तकसंग्रह आणि वाचन’ या विषयावर सुप्रसिद्ध कवी व अभिनेते किशोर कदम, गणेश विसपुते व पंकज भोसले संवाद साधतील.
तसेच यानिमित्त सतीश काळसेकर यांच्या संग्रहातील निवडक पुस्तकांचे प्रदर्शन मांडले जाणार असून, काळसेकरांची स्मृती म्हणून ती वाचकांना विकत घेता येतील. हे प्रदर्शन २४ जुलै रोजी सायंकाळपर्यंत खुले राहिल.
दरम्यान, २४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता लोकवाङ्मय गृह प्रकाशित ‘विस्मरणापल्याड’ या सतीश काळसेकर यांच्या स्मृतिग्रंथाचे आणि पपायरसतर्फे प्रकाशित ‘निरंतर’ या काळसेकरांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन लोकवाङ्मय गृह प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत कॉ. डॉ. भालचंद्र कानगो यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून साहित्यिक अर्जुन डांगळे, वसंत पाटणकर, नीतीन रिंढे उपस्थित राहतील.
पुस्तक प्रदर्शनासह सर्व कार्यक्रम मुंबईतील नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात होणार असून, या कार्यक्रमाला वाचक, साहित्य रसिक व सतीश काळसेकर प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.