कॉ. सुकुमार दामले यांना कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार जाहीर

मनमाड : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, स्वातंत्र्यसेनानी, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे नेते, खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे माजी आमदार कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ‘कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. यंदाचा जीवनौरव पुरस्कार आयटक कामगार संघटनेचे राष्ट्रीय सचिव कॉ. सुकुमार दामले (दिल्ली) यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती, स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड माधवराव गायकवाड बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा ॲड. साधना गायकवाड व सचिव कॉ. राजू देसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

कॉम्रेड माधवराव गायकवाड (बाबूजी) यांनी स्वातंत्र्य चळवळ तसेच खंडकरी शेतकरी चळवळीत प्रदीर्घ योगदान दिले असून, या लढ्यातून त्यांनी खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी मिळवून दिल्या आहेत. नांदगाव विधानसभेचे आमदार, महाराष्ट्र विधान परिषेदेचे सदस्य, विरोधी पक्षनेते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे १२ वर्षे राज्य सरचिटणीस, किसान सभेचे १५ वर्षे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. तसेच आयटक संलग्न नगरपालिका कर्मचारी संघटना, रेल्वे युनियन चळवळीत त्यांनी मोठे योगदान दिले आहे. १२ नोव्हेंबर २०१८ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

त्यांच्या विचारांचा वारसा व कार्य पुढे नेण्यासाठी स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड माधवराव गायकवाड बहुउद्देशीय संस्था स्थापन करण्यात आली आहे. संस्थेच्यावतीने आज त्यांच्या जन्मदिनी यावर्षीचा ‘कॉम्रेड माधवराव गायकवाड ४ था स्मृती जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड सुकुमार दामले (दिल्ली) यांना जाहीर करण्यात आला. रोख रक्कम ३१,००० रुपये, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

कॉ. सुकुमार वासुदेव दामले यांचा ३ नोव्हेंबर १९४८ रोजी हैदराबाद येथे आजोळी जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जळगाव जिल्ह्यातील अमळनेरला नगरपालिकेच्या शाळेत, त्यानंतर बुलढाणा, अमळनेर व सांगली येथे त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. वर्धा येथील जानकीदेवी बजाज महाविद्यालयात उच्चशिक्षण घेतल्यावर त्यांनी आय.आय.टी. कानपूर येथील १९७० साली पदवी संपादन केली. यानंतर मुंबई येथील भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये काही काळ नोकरी केली. पुढे माझगाव डॉक मुंबईमध्ये मर्चंट नेव्हीमध्ये एक वर्षांचे प्रशिक्षण घेऊन त्यांनी मरीन इंजिनिअर १९७५ ते १९७७ या काळात काम केले. त्यानंतर मात्र त्यांनी नोकरी सोडून, १९७७ पासून ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) या संघटनेच्या अंधेरी ट्रेड युनियन सेंटरमध्ये पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. १९९५ साली ते आयटकचे महाराष्ट्र राज्याचे जनरल सेक्रेटरी झाले. २०१५ साली अध्यक्ष आणि २०१७ पासून ते राष्ट्रीय सचिव म्हणून आयटक मुख्यालयात दिल्लीला कार्यरत आहेत. भविष्य निर्वाह निधीच्या सी.बी.टी.चे ते सदस्यही आहेत.

अंधेरी ट्रेड युनियन सेंटरच्या माध्यमातून त्यांनी कामगारांसाठी अनेक यशस्वी लढे उभारले. कामगारांना स्वस्तात घरे मिळावीत, यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करत आहेत. असंघटीत कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी ते काम करत आहेत. मुंबईत घरकामगार मोलकरीण संघटना उभारण्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटनेचे ते राज्याध्यक्ष आहेत. आयटकचे नेते कॉम्रेड ए. बी. बर्धन, कॉम्रेड गुरुदास दासगुप्ता, कॉम्रेड गंगाधर चिटणीस, कॉम्रेड धुमे, कॉम्रेड गोविंद पानसरे, कॉम्रेड माधवराव गायकवाड आदींच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केले आहे. आज ते आयटक राष्ट्रीय महासचिव कॉम्रेड अमरजीत कौर, भाकपचे नेते डॉ. भालचंद्र कानगो या सहकाऱ्यांसोबत ते कार्यरत आहेत. तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य म्हणूनही ते जबाबदारी सांभाळत आहेत.

श्रमिकांच्या चळवळीसाठी आयुष्य वेचणाऱ्या, समतेचे राज्य प्रस्थापित व्हावे यासाठी कार्यरत असलेले कॉम्रेड दामले वयाच्या ७५ व्या वर्षात पदार्पण करत असून, त्यांना कॉम्रेड माधवराव गायकवाड जीवनगौरव स्मृती पुरस्कार जाहीर करताना आनंद होत आहे. यापूर्वी हा पुरस्कार शेतकरी नेते राजू शेट्टी, एम. ए. पाटील, मोहन शर्मा यांना प्रदान करण्यात आला आहे, अशी माहिती स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड माधवराव गायकवाड बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा ॲड. साधना गायकवाड व सचिव कॉम्रेड राजू देसले यांनी दिली आहे. यावेळी विश्वस्त भास्कर शिंदे, कुसुमताई गायकवाड, रिकब जैन, सुभाष बेदमुथा, छबूशेठ शिरसाठ, मिखील स्वर्ग, व्ही डी. धनवटे, कॉम्रेड दत्तू तुपे आदी उपस्थित होते.

Leave a Comment

What does "money" mean to you?
  • Add your answer