नाशिक जिल्ह्यात कॉम्रेड डांगे यांच्या स्मारकासाठी भा.क.प. – आयटक प्रयत्नशील

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील करंजगाव येथे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते व स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा जन्म झाला. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी लढा दिला. शिवाय स्वातंत्र्यानंतर श्रमिकांच्या प्रश्नांसाठी चळवळ उभारली. स्वातंत्र्यासाठी जवळपास १७ वर्षे तुरुंगवास भोगलेल्या कॉम्रेड डांगे यांच्या कार्याला स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्यानिमित्ताने नाशिक जिल्हा परिषदेच्यावतीने अभिवादन करण्यात येणार आहे.

नाशिक जिल्हा परिषदेच्यावतीने कॉम्रेड डांगे यांच्या वारस असलेल्या त्यांच्या नात परी देशपांडे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. आज मुंबईहून परी देशपांडे यांचे नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात आगमन झाले असता, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. राजू देसले यांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले.

यावेळी परी देशपांडे यांनी त्यांच्या आई माजी खासदार रोझा देशपांडे व आजोबा कॉम्रेड डांगे यांच्या आठवणींना उजाळा दिला. नाशिक जिल्ह्यात कॉम्रेड डांगे यांचे स्मारक व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

याबाबत भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आयटक कामगार संघटना पाठपुरावा करेल, अशी ग्वाही कॉ. राजू देसले यांनी दिली. याप्रसंगी ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनचे राज्याध्यक्ष विराज देवांग, मुक्ता कावळे, तलहा शेख, प्रा.डॉ. रामदास भोंग, ॲड. तात्याराव जाधव आदी उपस्थित होते.

Leave a Comment

What does "money" mean to you?
  • Add your answer