



नाशिक : महाराष्ट्र राज्यभरातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या भोजन डी.बी.टी, निर्वाह भत्ता व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसंदर्भातील प्रलंबित प्रश्नांबाबत ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनच्या (AISF) पदाधिकाऱ्यांनी आज आदिवासी विकास आयुक्तांची भेट घेतली. जुलै २०२२ या स्पेशल सायकलची डी.बी.टी. तत्काळ विद्यार्थ्यांना मिळावी, अशी मागणी AISF कडून करण्यात आली. याची तातडीने दखल घेत आयुक्तालय प्रशासनाने आज (८ ऑगस्ट २०२२) संध्याकाळी राज्यभरातील आदिवासी विद्यार्थ्यांची हक्काची D.B.T. रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग केली आहे.
गेल्या दोन वर्षांत विशेषतः कोरोनापश्चात आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक योजनांमधून मिळणारा लाभ अनियमित असल्याने, त्याचा विद्यार्थी वर्गाला मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. एकीकडे आदिवासी महिला देशाच्या राष्ट्रपतीपदी विराजमान होतात, त्या अनुषंगाने समाज निश्चितच प्रगतीपथावर असल्याचे माध्यमांकडून, सरकारी यंत्रणांकडून भासवले जाते. पण दुसरीकडे मात्र एकंदरीत आदिवासी समाजाला, विद्यार्थ्यांना आपल्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करावा लागत आहे, ही शोकांतिका आहे.
वसतिगृहातील विद्यार्थ्यांची D.B.T. मिळाली असून, ऑगस्टची स्पेशल सायकल D.B.T. आणि पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेच्या लाभार्थ्यांच्या अनुदानासाठी AISF संघर्ष चालू ठेवणार आहे. यावेळी AISFचे राज्याध्यक्ष कॉ. विराज देवांग यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.