औरंगाबाद : सेंट्रल व्हिस्टा बिल्डिंगवर नवीन हिंस्त्र सिंहाची राजमुद्रा बसवू नका, यासह अन्य मागण्यांसाठी औरंगाबाद येथे आयटक कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली सुमारे ५०० अंगणवाडी सेविकांनी जेलभरो आंदोलन करत स्वतःला अटक करवून घेतली.
कॉम्रेड प्रा. डॉ. राम बाहेती यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सारनाथची सुंदर अशी राजमुद्रा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती व पंतप्रधानांना निवेदनासोबत पाठविण्यात आली. सारनाथचीच पूर्वीची राजमुद्राच सेंट्रल व्हिस्टा बिल्डिंगवर राहू द्यावी, असे आवाहनही निवेदनातून करण्यात आले. ‘नवीन संसदेच्या राजमुद्रेवरील क्रुर सिंह आम्हाला गिळेल’, अशी भीती यावेळी सेविकांनी व्यक्त केली.
आपल्या दैनंदिन लढ्याची सांगड राजमुद्रेच्या विकृतीकरणाविरोधातील व संविधानावरील वाढत्या हल्याविरोधातील लढ्याशी घालूया. धर्मांध, जातीय राजकारणाविरोधातील लढ्याशी, कार्पोरेट हाऊसेसच्या बाजूने धोरणे राबवणाऱ्यांच्या विरोधातील लढ्याशी आपल्या लढ्याला जोडूया, असे आवाहन कॉ. डॉ. बाहेती यांनी यावेळी केले.