मुंबई : १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. भारतीय स्वातंत्र्य हे केवळ सत्तांतर नव्हते. भारतीय स्वातंत्र्याचा अर्थ गोरे इंग्रज शासक निघून गेले आणि त्यांच्या जागी भारतीय शासक आले इतका मर्यादित नाही, तर शतकानुशतकांच्या वर्णवर्चस्ववादी आणि त्यानंतरच्या दीडशे वर्षांच्या साम्राज्यवादी शोषणातून पिचलेल्या आणि गांजलेल्या करोडो भारतीयांच्या गुलामीच्या शृंखला यादिवशी निखळून पडल्या.
भारतीय जनता आता प्रजा राहिली नव्हती तर ते स्वतंत्र देशाचे नागरिक बनले होते. भारतीय स्वातंत्र्याने त्यांच्या उत्थानाचा मार्ग खुला केला. यादिवशी जशी साम्राज्यवादी शक्तींच्या जोखडातून भारतीय जनता मुक्त झाली, तशीच ती राजे-महाराजे आणि नबाब-बादशहांच्या अनियंत्रित आणि लहरी राज्य कारभारापासूनही मुक्त झाली.
एका नव्या राष्ट्राचा जन्म झाला, एका नव्या युगाला प्रारंभ झाला. या युगाने इतिहासात पहिल्यांदाच देशातील साऱ्यांना समतेची हमी देऊन सर्व प्रकारांच्या शोषणापासून मुक्तीची वाट मोकळी करून दिली. १५ ऑगस्ट १९४७ हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण होता. त्या क्षणाला येत्या १५ ऑगस्टला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.
अशा या ऐतिहासिक क्षणाचा आनंद आपण सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन उत्साहाने साजरा करायचा आहे. कारण भारतीय स्वातंत्र्य या देशातील सार्या जाती-धर्माच्या लोकांनी संघटितपणे लढा देऊन मिळवलेले आहे. या स्वातंत्र्यासाठी हजारोंनी त्यांच्या प्राणाचे बलिदान दिले. लाखोंनी तुरुंगवास पत्करला आणि करोडो लोकांनी हालअपेष्टा सहन केल्या. ती सारी महान माणसे आपले जाती-धर्म विसरून स्वातंत्र्याची लढाई संघटितपणे लढत होती. या देशाची भूमी सर्वधर्मीयांच्या रक्ताने रंगली आहे. म्हणूनच या देशावर आणि या आनंदाच्या ऐतिहासिक क्षणावर सर्व जातीधर्मीयांचा समान हक्क आहे.
म्हणूनच १५ ऑगस्ट २०२२ या दिवशी आपण सर्वधर्मीय बांधवांना एकत्र करून स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करत आहोत. या जल्लोषाची मिरवणूक दुपारी ३ वाजता दादर पश्चिमेच्या वीर कोतवाल उद्यानापासून सुरू होऊन ती चैत्यभूमी दादर पर्यंत जाईल.
ही भारताच्या तिरंग्याची मिरवणूक आहे. या मिरवणुकीत सर्वधर्मीय व्यक्ती आणि धर्मगुरू, विद्यार्थी, शिक्षक, युवक-युवती आणि कामगार सामील होणार आहेत. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी जल्लोषात आपणही सामील व्हा, असे आवाहन स्वातंत्र्य उत्सव समिती, मुंबईच्यावतीने न्यायमुर्ती अभय ठिपसे, डॉ. झहीर काझी, फादर मेस्केरेन्हास फ्रेझर, डॉ. विवेक कोरडे, कॉ. विश्वास उटगी, शाकीर शेख, जनार्दन जंगले, उज्वला पटेल यांनी केले आहे. इच्छुकांनी 9820147897 अथवा 9833075606 या क्रमांकावर संपर्क साधावा.