‘आशां’चे आंदोलनस्थळी अनोखे रक्षाबंधन; भावाला लढण्यासाठी साथ देण्याचा केला संकल्प!

नाशिक : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विविध मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तकांनी आज नाशिक जिल्हा परिषेदवर भरपावसात भव्य तिरंगा मोर्चा काढला. याचवेळी रक्षाबंधनाचे औचित्य साधून आशा – गटाप्रवर्तकांनी आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेचे राज्याध्यक्ष कॉम्रेड राजू देसले यांना राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. आमच्या न्याय मागण्यांसाठी भावाला लढण्यासाठी साथ देण्याचा संकल्पच जणू यावेळी आशा व गटप्रवर्तकांनी केल.

कोरोना काळात देशभर आशा, गटप्रवर्तकांनी जिवावर उदार होऊन, आरोग्यसेवा करत देशसेवेचे काम केले. मात्र केंद्र व राज्य सरकारने त्यांच्या कामाची पुरेशी दखल घेतली नाही. देशात फक्त प्रवास भत्ता देऊन मोफत काम गट प्रवर्तकांकडून करून घेतले जात आहे. वेतनवाढीसह त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना, देशाच्या राष्ट्रपतीपदी महिला विराजमान असताना, ‘आशां’ना मात्र २४ तास अल्प मानधनावर राबवून घेतले जात आहे.

म्हणूनच आशा व गटप्रवर्तकांना किमान वेतन मिळावे, या मागणीसाठी तीव्र संघर्ष उभारण्याचा निर्धार करत आज आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्यावतीने नाशिक जिल्हा परिषद कार्यालयावर भव्य तिरंगा मोर्चा काढण्यात आला आणि मागण्यांचे निवेदन प्रशासनास देण्यात आले.

आशा व गटप्रवर्तक महिलांनी आज केलेल्या या अनोख्या रक्षाबंधनाबद्दल भावना व्यक्त करताना कॉ. राजू देसले म्हणाले, की आशा व गटप्रवर्तक बहिणींनी मला राखी बांधून, माझ्यावर दाखविलेला विश्वास मला लढण्यासाठी नक्कीच प्रेरणादायी राहील.

Leave a Comment

What does "money" mean to you?
  • Add your answer