दीडशे वर्षापेक्षा प्रदीर्घकाळ जनसामान्यांनी जो लढा दिला, देहदंड सोसले, त्याग केला, बलिदान दिले या सर्व तपश्चर्येनंतर १५ ऑगस्ट १९४७ हा स्वातंत्र्याचा दिवस उगवला. स्वातंत्र्य म्हणजे काय, ते कसे मिळाले, त्यासाठी कोणी प्रयत्न केले, त्या लढ्याच्या प्रेरणा कोणत्या, या सर्वांची स्पष्ट जाणीव करून देणाऱ्या या संग्रामाचा वस्तुनिष्ठ इतिहास लिहिला गेला असे म्हणणे अवघड आहे. कोणत्यातरी एका महान नेत्यामुळे, एका राजकीय पक्षामुळे, अहिंसेच्या मार्गाने रक्ताचा एक थेंबही न सांडता दमणकारी ब्रिटिश सत्तेपासून आपण स्वातंत्र्य मिळविले असेही म्हणता येत नाही. तरी या स्वातंत्र्यसंग्रामामध्ये देशातील आदिवासी, भिल्ल, कातोडी, रामोशी, युवक, विद्यार्थी, महिला, कामगार, शेतकरी व मध्यमवर्ग, दलित, शोषित या समाजाच्या सर्व विभागांनी या संग्रामामध्ये सहभाग घेतला होता.
जवळजवळ प्लासीच्या लढाईनंतर या देशात स्वातंत्र्याच्या उर्मी जाग्या होऊ लागल्या. आपल्या जल, जंगल, जमीन हिच्या रक्षणासाठी इंग्रजांविरुद्ध आदिवासी संथाळ भिल्ल यांनी रणशिंग फुंकले. यामध्ये बिरसा मुंडा यासारख्या योद्ध्याने इतिहास घडवला. पुढे १८५७ चा रणसंग्राम पेटला. यात शिपाई, लहानसे संस्थानिक, त्यांची प्रजा, देशातील सर्वसामान्य जनता जातीपातीच्या व धर्माच्या भिंती ओलांडून या स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाली होती. म्हणूनच कॉम्रेड कार्ल मार्क्ससारख्या विचारवंतांनी या घटनेची गौरवपूर्ण शब्दात दखल घेतली. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सुभाषबाबू यांसारखे नेते निश्चितच या लढ्याला नेतृत्व देत होते व सर्व स्वातंत्र्यप्रेमी जनता राष्ट्रीय काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आली होती. तो फक्त एक राजकीय पक्ष नव्हता; तर ते जनतेचे महान आंदोलन होते. या आंदोलनात असीम त्यागाने भारतीय कम्युनिस्ट पक्ष उतरला होता. स्वातंत्र्यसंग्रामाला कष्टकरी जनतेच्या ताकतीने कम्युनिस्ट पक्षाने एका उच्च दर्जावर नेऊन ठेवले, हे नम्रपणे नमूद करावेसे वाटते. सन १९२० पासून ते स्वातंत्र्याच्या प्राप्तीपर्यंत कम्युनिस्ट्रांनी अपूर्व असे योगदान दिले.
महान ऑक्टोबर क्रांतीपासून प्रेरणा घेऊन २६ डिसेंबर १९२५ रोजी मौलाना हसरत मोहनी, सिंगारवेलू चेट्टीयार, एस. ए. डांगे यासारख्या महान क्रांतिकारकांनी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. १९२६ च्या अहमदाबाद येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या आंदोलनात हसरत मोहानी यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. ही मागणी अव्यवहारी आहे म्हणून महात्मा गांधी यांनी ती नाकारली. पुढच्या वर्षी १९२७ रोजी काँग्रेसच्या अधिवेशनात कम्युनिस्टांनी पुन्हा एकदा या मागणीचा जोरदारपणे पुनरुच्चार केला. स्वातंत्र्य आंदोलन जेव्हा नव्या टप्प्यावर पोहोचले, तेव्हापासून ते आत्तापर्यंत कम्युनिस्टांनी कामगार, शेतकरी, युवक, विद्यार्थी, महिला, क्रांतिकारक या विभागातून अनेक देशभक्त देशाच्या स्वातंत्र्य लढ्यास दिले.
सन १९२० साली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच आयटकची स्थापना झाली. त्याचवर्षी कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखाली २०० संप केले गेले. १९२४ च्या संप लढ्यात लाखो कामगार सहभागी झाले. यातूनच आठ तासाचा कामाचा दिवस, कामगारांच्या इतर मागण्यांबरोबरच स्वातंत्र्याच्या हक्काची मागणीदेखील केली गेली. १९२५ च्या कोलकत्ता येथील काँग्रेसच्या अधिवेशनात ५०,००० कामगार मोर्चाने गेले व तेथे संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी त्यांनी केली. १९२८ साली जवळजवळ ६,००,००० कामगारांनी २०३ संप लढवले. या लढ्यातूनच ‘इन्कलाब जिंदाबाद’ या घोषणेचा जन्म झाला. कम्युनिस्टांनी कामगारांच्या या लढ्याला धार आणली. परिणामी कामगार हा एक वर्ग म्हणून संघटित झाला. देशपातळीवर कामगारांची एकजूट निर्माण केली गेली. त्याला स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा दिली. ब्रिटिश सत्तेचा प्रतिनिधी म्हणून १९२१ साली प्रिन्स ऑफ वेल्स याच्या आगमनामुळे, संतप्त झालेल्या हजारो कामगारांनी निषेध नोंदवला. याचाच भाग पुढे १९४६ साली नाविकांच्या बंडाची स्वातंत्र्याच्या इतिहासात महत्त्वाची नोंद झाली.
कामगारांसोबत शेतकरीही या लढ्यात अग्रभागी राहिले. सहजानंद भारती, इंदुलाल याज्ञिक, धर्मानंद कोसंबी, क्रांतिसिंह नाना पाटील व त्यांचे सहकारी यांनी ब्रिटिश वसाहती विरुद्ध जमीनदार व सावकार यांच्याविरोधात किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जोरदार संघर्ष केला. नौकालीचे शेतकऱ्यांचे आंदोलन, नीळ उत्पादक शेतकऱ्यांचा लढा, कय्यूर येथील शेतकऱ्यांचा उठाव, हैदराबादच्या नवाबाविरुद्धचा लढा, १९४५ सालचा बंगालचा दुष्काळ, तिभागा चळवळ, १९४६ चे वायलरचे आंदोलन या सर्वांमध्ये कम्युनिस्टांनी शेतकऱ्यांचे नेतृत्व केले.
क्रांतिकारकांचा लढा व कम्युनिस्ट यांचे अतूट नाते होते. कानपूर व मीरतचा मेरठचा कट यामध्ये कॉ. एस. ए. डांगे, नलिनी गुप्त, एम. एन. रॉय, मुजफ्फर अहमद, शौकत उस्मानी इत्यादी क्रांतिकारक नेत्यांनी अतुलनीय अशी कामगिरी बजावली. १९२० चे जालियनवाला बाग हत्याकांड, सायमन कमिशनवर बहिष्कार, पार्लमेंटमधील शहीद भगतसिंग-बटुकेश्वर दत्त यांचा बॉम्बस्फोट, कामगार व शेतकऱ्यांविरुद्धच्या जाचक कायद्याविरुद्धचा लढा, रशियन क्रांतीपासून प्रेरणा घेऊन भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आजाद यासारख्या क्रांतिकारकांनी बलिदान दिले. यामध्ये ज्यांना तुरुंगवास झाला; त्यातून जे शिक्षा भोगून सुटले; त्यात अजय घोष , सोहन सिंग घोष, शिव वर्मा, सूर्य सेन, गणेश घोष व देशातील विविध तुरुंगातून छळयातना सोसून बाहेर आलेल्या क्रांतिकारकांनी पुढे भारतीय कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला.
या लढ्यापासून प्रेरणा घेऊन बंगाल, पंजाब, उत्तर प्रदेश व अन्य ठिकाणी नौजवान भारत सभा, हिंदुस्थान सोशालिस्ट आर्मी, युगांतर, अनुशीलन गट यात जे क्रांतिकारक सहभागी झाले तसेच गदर आंदोलन इत्यादी घटनांमधील क्रांतिकारकही पुढे कम्युनिस्ट पक्षात सहभागी झाले. महिला व मध्यमवर्ग यांच्या लढ्याचे नेतृत्वही कम्युनिस्ट पक्षाने केले. एकूणच कम्युनिस्टांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात नि:स्पृहतेने, नि:स्वार्थतेने योगदान देत, त्याग व बलिदानाने इतिहासाच्या पानात नोंद केली.
कम्युनिस्टांनी या सर्व लढ्यात प्रगतशील जनता व राष्ट्रीय काँग्रेस यांच्याबरोबर सहभाग देऊन, जातीधर्माच्या पलीकडे सहअस्तित्वाची भावना जनतेत रुजविण्याचा प्रयत्न केला. जनसामान्यांसाठी कनिष्ठांना अभिप्रेत असलेले स्वातंत्र्य अजूनही पूर्णत्वास आलेले नाही व त्यासाठीचा संघर्ष अद्यापही चालूच आहे.
यदांच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले आहे, “कुठल्याही एका नेत्यांनी, पक्षाने हा बदल घडवून आणलेला नाही. जेव्हा जनता रस्त्यावर उतरली तेव्हा स्वातंत्र्य मिळाले”. त्यांचे हे उद्गार त्यांच्या संघटनेला लावल्यास विपरीत असे चित्र दिसेल. एक पक्ष किंवा संघटना म्हणून ते स्वातंत्र्य आंदोलनात कुठेही नव्हते. उलट ब्रिटिशधार्जिणे संस्थानिक, जमीनदार यांच्या सहाय्याने देशाचा स्वातंत्र्यलढा लढविण्याऐवजी, त्यांनी धर्म संरक्षणाची संकुचित भूमिका घेतली होती. डॉ. हेडगेवार यांनी ब्रिटिशविरोधी आंदोलनात सहभागी होण्याऐवजी हिंदूंचे संघटन करण्यात स्वतःला गुंतविले. असहकारतेची चळवळ, कायदेभंगाची चळवळ, दांडी यात्रा, भारत छोडो यात्रा यासारख्या कुठल्याही क्रांतिकारक लढ्यात ते सहभागी झाले नाहीत. उलट भगतसिंगासारख्या क्रांतिकारकांना बिघडलेले बेटे अशा शब्दात अवमानित केले गेले. याच काळात त्यांनी मनुस्मृतीचे कौतुक करण्याची व फॅसिष्ट विचारांचे अनुकरण करण्याची मोहीम सुरू केली. मुस्लिम, ख्रिश्चन व कम्युनिस्टांना देशासाठी सर्वात मोठा धोका मांडले व मुस्लिमांना पूर्ण अधिकार देण्याऐवजी आमच्यात सहभागी व्हा किंवा दुय्यमत्व स्वीकारा असा आदेश दिला.
आज मोठा गाजावाजा करून घरघर तिरंगा फडकवू पाहणाऱ्यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी राष्ट्रध्वजाऐवजी काळा झेंडा फडकवला. जवळजवळ २००३ सालापर्यंराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील मुख्य कार्यालयावर तिरंगा फडकवला गेला नाही. स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास विकृत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या सर्व घटनांनी नव्या पिढीला अवगत केले पाहिजे, तरच खऱ्या देशभक्तीची ज्योत तेजस्वी होईल.
– प्रा. तानाजी ठोंबरे, बार्शी