नाशिक : केंद्रीय कामगार मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा आणि विकास बोर्डाच्या नाशिक विभागीय सल्लागार समितीच्या सदस्यपदी आयटक कामगार संघटनेचे राज्य सचिव कॉ. राजू देसले यांची निवड झाली आहे. नाशिक विभागात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ११ जिल्ह्यांचा समावेश असून, संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढणाऱ्या नेतृत्वाची सल्लागार सदस्यपदी निवड झाल्याने, सर्वस्तरातून कॉ. राजू देसले यांच्या निवडीचे स्वागत केले जात आहे.
केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाच्यावतीने कामगारांसाठी प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येतात. तसेच कामगार नेतृत्व, कार्यकुशलता, आर्थिक नियोजन, बचतीचे महत्त्व, व्यसनमुक्ती, विविध शासकीय योजना माहिती, कामगार कायदे, मानसिक ताणतणावप्रश्नी कार्यक्रम घेतले जातात.
अशा महत्वपूर्ण संस्थेच्या सल्लागार समिती सदस्यपदी कॉ. देसले यांची २ वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे. कॉ. देसले आशा, गटप्रवर्तक, मनरेगा कंत्राटी कर्मचारी, घरकामगार मोलकरीण, बांधकाम कामगार, इपीएस ९५ पेन्शनर्स अशा असंघटीत क्षेत्रातील कामगार, कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्षरत आहेत.
संस्थेच्या विभागीय संचालिका सारिका डोईफोडे यांच्या हस्ते कॉ. देसले यांना निवडीचे पत्र दिले. दरम्यान, कॉ. राजू देसले यांचे या निवडीबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत असून, आयटकचे राज्य सरचिटणीस कॉम्रेड श्याम काळे, राज्य उपाध्यक्ष व्ही. डी. धनवटे यांच्यासह महाराष्ट्रातील कामगार नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.