औरंगाबाद : शहरातील विश्रांतीनगर, जयभवानी नगर येथील नागरिकांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली विविध नागरी मागण्यांसाठी महानगरपालिकेसमोर तीव्र निदर्शने केली. यावेळी महानगरपालिकेच्या आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, की विश्रांतीनगर व जयभवानी नगर या वसाहतीत मोठ्या संख्येने सर्वसामान्य कामगार, कष्टकरी राहतात. या कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी महापालिकेने १० वी पर्यंत CBSE ची शाळा सुरू करावी. तसेच अंगणवाड्या देखील सुरू कराव्यात, जेणेकरून या परिसरातील मुलांना एक चांगले आणि मोफत शिक्षण मिळेल.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सततच्या आंदोलनामुळे विश्रांतीनगर येथे ५ वर्षांपूर्वी पाईपलाईन टाकण्यात आली. परंतु अद्याप नळ कनेक्शन दिलेले नाही. जर नळ कनेक्शन दिले असते तर महापालिकेला आर्थिक फायदाच झाला असता. पाईपलाईन टाकून ५ वर्षापेक्षा जास्त काळ उलटला आहे. कदाचित पाईपलाईन गंजून देखील गेली असेल, असा विचार नागरिकांना येतोय. तेव्हा विश्रांतीनगर भागातील नागरिकांना नळ कनेक्शन त्वरित देण्यात यावे.
तसेच रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे, यासह इतर मागण्यांचा समावेश या निवेदनात करण्यात आला आहे. या मागण्यांचा गांभीर्याने विचार न केल्यास, नागरिकांच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
याप्रसंगी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. मधुकर खिल्लारे, भास्कर लहाने, वसुधा कल्याणकर, सुरेश ठोंबरे, सुभाष साबळे, रुपचंद ढवळणपूरे, संजय अंभोरे, सदाशिव मानकरी, विशाल नरवडे, रवी बोरकर, निर्मला वाकोडे, अजय चव्हाण, रेखा बोधक, कल्पना प्रधान, मीनाक्षी मोरे, प्रेमनाथ दांडगे, मंगल बोधक, अनिता म्हस्के, कौसल्या सोनवणे, सुरेखा थोरात, ज्योती शिंदे, रेणुका वाळके यांच्यासह भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.