भाकप नाशिक शहर सचिवपदी तल्हा शेख यांची निवड

नाशिक : शहरातील द्वारका परिसरातील खरबंदा पार्क येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नाशिक शहर अधिवेशन उत्साहात पार पडले. या अधिवेशनात शहर सचिव म्हणून तल्हा शेख यांची निवड करण्यात आली. तर सहसचिव म्हणून राहुल अढांगळे व कैलास मोरे यांची निवड करण्यात आली.

भाकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. राजू देसले यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्‌घाटन करण्यात आले. मावळते शहर सचिव कॉ. महादेव खुडे यांनी अधिवेशनाचे प्रास्ताविक केले. तसेच गेल्या ३ वर्षात पक्षाच्यावतीने आणि जनसंघटनांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा सविस्तर अहवाल सादर केला. संघटनात्मक अहवालात तसेच राजकीय अहवालातील अपुऱ्या बाबींवर प्रकाश टाकताना उपस्थित प्रतिनिधींनी त्यात भर घातली. तसेच येऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षाच्या रणनितीवर उपस्थित प्रतिनिधींनी आपले मत व्यक्त केले.

अधिवेशनात सर्वानुमते १५ सदस्यीय शहर कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अधिवेशनात पक्षाच्या संघटकपदी भीमा पाटील, पूनमचंद शिंदे, खजिनदार म्हणून प्राजक्ता कापडणे यांच्यासमवेत सदस्य म्हणून दिनेश वाघ, एस. आर. खतीब, मनोहर पगारे, पद्माकर इंगळे, रामदास भोंग, राजू देसले, महादेव खुदे व विराज देवांग यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

कॉ. देसले यांनी आपल्या भाषणात नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. नाशिकमध्ये पक्षाच्या झालेल्या सकारात्मक बदलांबद्दल बोलताना भाकप नाशिक हे राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्व जिल्ह्यांसाठी एक आदर्श मॉडेल म्हणून उभा राहील. जिल्ह्यात पक्षबांधणी मजबूत करून मनपा, तसेच जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जाऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय पक्षाच्या ठरावानुसार पक्षात अधिकाधिक युवकांना प्राधान्य देण्याचे ठरले असताना ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे जिल्हा समन्वयक कॉम्रेड तल्हा शेख यांची वयाच्या २५ व्या वर्षी शहर सचिवपदी निवड झाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

यावेळी भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ. राजू नाईक, कॉ. व्ही. डी. धनवटे, नाशिक जिल्हा सहसचिव कॉ. दत्तू तुपे, कॉ. एम. आर. खतीब, विराज देवांग आदी पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.

Leave a Comment

What does "money" mean to you?
  • Add your answer