रशियामध्ये आज कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. ही बाब समस्त अण्णा भाऊप्रेमी जनतेसाठी आनंददायी आहे. ज्या रशियन क्रांतीचे गुणगान अण्णा भाऊंनी आपल्या साहित्यातून गायले, त्या रशियाच्या क्रांतिकारी भूमीत हा पुतळा उभा राहत असल्याने त्या क्रांतिकारी ऋणानुबंधांची उजळणी होणे गरजेचे आहे.
अण्णा भाऊंनी १९६१ साली रशियाचा प्रवास केला. त्यांची प्रेरणा ही एका क्रांतिकारी भूमीला समजावून देणे, ज्यांच्या अतुलनीय त्यागातून ही क्रांती साकार झाली; त्या रशियन जनतेशी हितगुज करणे, समाजसत्तावादी क्रांतीचा महानायक कॉम्रेड लेनिन यांना अभिवादन करणे अशी होती. ज्या समाजसत्तावादासाठी अण्णा भाऊंनी आयुष्यभर अथक संघर्ष केला तो समाजवादी देश प्रत्यक्ष पाहण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर, अण्णा भाऊंनी ‘माझा रशियाचा प्रवास’ हे अप्रतिम प्रवासवर्णन लिहिले.
मराठी साहित्यातील बहुतेक प्रवासवर्णने ही पाश्चात्य देशांतील सहलींची वर्णने आहेत. तसे पाहिले तर उच्चजात-वर्गासाठी जीवन हे ‘सहलच’ असते, तर शोषितांचे जीवन हा ‘संघर्ष’ असतो. हा संघर्ष क्रांतिकारी संघर्ष बनल्यानंतर त्यात तमाम शोषितांच्या मुक्तीचा विचार येतो. समाजसत्तावादी क्रांतिनेच ते शक्य होते. रशियात ते कसे झाले याबाबत अण्णा भाऊ वाचून, ऐकूण होते. ते प्रत्यक्ष बघायला मिळणे हा अण्णा भाऊंच्या जीवनातील सर्वोच्च आनंद होता. त्यातूनच हे प्रवासवर्णन साकार झाले, म्हणून त्या प्रवासवर्णनाला शोषित जनतेच्या क्रांतिकारी त्यागाचा सुगंध आहे.
अण्णा भाऊंचा रशियात पुतळा बसविणे हे जितके आनंददायी आहे, तितकेच दु:खदायक त्या पुतळ्याचे अनावरण हे अण्णा भाऊंच्या विचारांच्या मारेकऱ्यांच्या हस्ते होणे! देवेंद्र फडणवीसांच्या दृष्टीने आंबेडकरांचे सान्निध्य असलेली ठिकाणे ही ‘तीर्थस्थाने’ आहेत, तसेच हे आहे. आपल्या दृष्टीने ती क्रांतिकारी ऊर्जेची केंद्रे आहेत, असायला हवीत. त्यामुळे अण्णा भाऊंच्या रशियातील पुतळ्यातून शोषित जनतेला क्रांतिची प्रेरणा मिळावी, हाच उद्देश असला पाहिजे. फडणवीसांचा तसा उद्देश खचितच नाही. ‘आयजीच्या जीवावर बायजी’ करत असताना पुतळ्याआडून बरेच तीर मारण्यात आले आहेत. बिझनेस टायकुन्सच्या भेटीगाठी व शासकीय खर्चातून झालेले पर्यटन इतकाच त्यांच्या लेखी या घटनेचा अर्थ आहे, हे समस्त अण्णा भाऊ प्रेमींनी लक्षात घेतले पाहिजे. यानिमित्ताने भारतातील मॅक्झिम गॉर्कीला आठवणीत ठेवणाऱ्या तमाम रशियन जनतेच्या मित्रतेला क्रांतिकारी सलाम!
कॉ. महादेव खुडे
जिल्हा सचिव,
भारतीय कम्युनिस्ट पक्ष, नाशिक