मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील रिक्त पदे ताबडतोब भरावीत, तसेच राज्य सरकारच्या विविध विभागांतील रिक्त असलेल्या दीड लाखांहून अधिक पदांवर तत्काळ नोकरभरती करावी, या मागणीसाठी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (A.I.S.F.) आणि ऑल इंडिया युथ फेडरेशन (A.I.Y.F.) च्या संयुक्त विद्यमाने २५ नोव्हेंबरनंतर प्रत्येक जिल्हास्तरावर विद्यार्थी – युवकांचे मिळावे घेऊन, लवकरच मुंबईत राज्यव्यापी परिषद घेण्याचा निर्धार आज मुंबई येथे झालेल्या A.I.S.F. व A.I.Y.F. पदाधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय बैठकीत करण्यात आला. तसेच प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकांच्या मुख्य शाखांवर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पुढाकाराने ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन व ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या राज्य कौन्सिलची संयुक्त बैठक मुंबई येथील भूपेश गुप्ता भवन येथे पार पडली. बैठकीला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॉ. डॉ. भालचंद्र कानगो, राज्य सचिव कॉ. सुभाष लांडे, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस कॉ. देवीदास तुळजापूरकर, पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य कॉ. प्रकाश रेड्डी, मुंबई सचिव कॉ. मिलिंद रानडे, कंट्रोल कमिशनचे अध्यक्ष कॉ. प्रकाश नार्वेकर, A.I.Y.F. चे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य गिरीश फोंडे, राज्याध्यक्ष कॉ. भाऊराव प्रभाळे, राज्य सेक्रेटरी जावेद तांबोळी, A.I.S.F. चे राज्याध्यक्ष कॉ. विराज देवांग, राज्य सेक्रेटरी प्रशांत आंबी यांची प्रमुख उपस्थिती होती.
देशात १६ लाख पदे, महाराष्ट्रात राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये १ लाख ५७ हजार पदे, विविध राष्ट्रीयकृत बँकेतील सुमारे दीड लाख पदे रिक्त आहेत. तर एकट्या रेल्वेमध्ये ४ लाख पदे रिक्त असल्याची आकडेवारी बैठकीच्या प्रारंभी मांडण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना कॉ. डॉ. भालचंद्र कानगो म्हणाले, की बेरोजगारी हा भांडवलशाहीला लागलेला रोग आहे. विरोधकांनी निर्माण केलेल्या प्रश्नांची उत्तरे देत बसण्यापेक्षा आपण विरोधकांना प्रश्न केले पाहिजेत. तसेच ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन आणि ऑल इंडिया युथ फेडरेशनने BNEGA (बनेगा) कायदा संमत व्हावा आणि सरकारी रिक्त पदे त्वरित भरावीत, या दोन मागण्या प्रामुख्याने कराव्यात. मागण्या करताना त्या समाजमान्य असल्या पाहिजे, तसेच त्या अचूकपणे करता आल्या पाहिजेत. बेरोजगारीचा प्रश्न तीव्र झालेला असून राज्यातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी तीव्र स्वरूपाची चळवळ उभी करावी.
बेरोजगारीच्या विरोधात आणि भगतसिंग रोजगार हमी कायद्यासाठी (BNEGA) एका कृतिशील कार्यक्रमाची गरज असून, बेरोजगारी विरूद्धच्या चळवळीत आता पक्ष आणि संघटनांनी एकत्र आंदोलन उतरावे. पक्ष त्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे कॉ. सुभाष लांडे यांनी सांगितले.
बैठकीला खास उपस्थित असलेले कॉ. देवीदास तुळजापूरकर यांनी बँकिंग क्षेत्रावर बोलताना सार्वजनिक बँकेतील सध्याची परिस्थिती सांगितली. सार्वजनिक बँकेत खातेदारांची संख्या वाढत आहे, परंतु अनेक वर्षांपासून रिक्त पदे भरली जात नाहीत. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे. त्यामुळे सेवा देण्यात या बँका कमी पडत आहेत. लोकांनी खाजगी बँकांकडे जावे असा सरकारचा डाव आहे. राज्यातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये दीड लाखाहून अधिक पदे रिक्त आहेत. त्यासाठी आंदोलन उभे करण्याची गरज आहे.
यावेळी कॉ. गिरीश फोंडे, जावेद तांबोळी, भाऊराव प्रभाळे, प्रशांत आंबी यांनीही मार्गदर्शन केले. दरम्यान, विराज देवाग यांनी २५ नोव्हेंबरला दिल्ली येथे होणाऱ्या ‘पार्लमेंट मार्च’ बद्दल माहिती दिली. दरम्यान, ‘बँकिंग क्षेत्रातील बेरोजगारी’ या विषयावर देवीदास तुळजापूरकर छोटी पुस्तिका लिहिणार असून, ती राज्यभरात वितरीत करण्याचे ठरले.
बैठकीला दोन्ही संघटनेचे राज्य सचिव मंडळ व कौन्सिल सदस्य उपस्थित होते. तसेच मुंबई, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, अहमदनगर, बीड, अमरावती, सातारा आदी जिल्ह्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


2 thoughts on “बँकांमधील रिक्त जागा ताबडतोब भरण्यासाठी A.I.S.F. – A.I.Y.F. पुकारणार राज्यव्यापी एल्गार”
सरकारचे डोके ठिकाणावर आहे का
ही विचारण्याची वेळ आली आहे हे सरकार लोकशाही पध्दतीने काम करत नसून एकाधिकारशाही पणे चालू आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तसे अता संघर्ष केला तर आणि तरच कामगारांचे प्रश्न सुटतील देशातील सर्व स्तरातील कामगारांनी एकत्र येऊन हा लढा लढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही
Sir you are very good job and I’m so proud