‘आयटक’चे कोल्हापूरात १८ नोव्हेंबरपासून राज्य अधिवेशन
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात कामगार वर्गाचे अमूल्य योगदान दिलेल्या आणि १०२ वर्षांहून अधिक काळ लढाऊ संघर्षाची परंपरा असलेली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस अर्थात आयटक ही भारतातील पहिली राष्ट्रीय पातळीवरील कामगार संघटना म्हणून देशभर सुपरिचित आहे. ३१ ऑक्टोबर १९२० साली मुंबई येथे आयटक या पहिल्या देशव्यापी कामगार संघटनेची स्थापना झाली. लाला लजपतराय हे आयटकचे पहिले अध्यक्ष बनले. पुढे सी. आर. दास, सरोजिनी नायडू, पंडित जवाहरलाल नेहरु, नेताजी सुभघषचंद्र बोस अशा महनीय स्वातंत्र्ययोद्ध्यांनीही आयटकचे अध्यक्षपद भूषविले आहे. या संघटनेचा शताब्दी सोहळा २०२० साली मुंबईत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याचवेळी मुंबईत संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. दर ३ वर्षांनी अधिवेशन घेऊन लोकशाही पद्धतीने पदाधिकारी निवडणे, मागील काळातील लढ्यांचा आढावा घेणे आणि भविष्यकालीन कृती कार्यक्रम निश्चित करत पुढील कामगारवर्गीय लढ्याची रणनिती ठरविणे अशी घटनात्मक पद्धत या संघटनेने निश्चित केली आहे.
याअंतर्गत आयटक कागमार संघटनेचे १९ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन कोल्हापूरात आयोजित करण्यात येत आहे. दि. १८, १९ व २० नोव्हेंबर २०२२ रोजी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे होणाऱ्या या अधिवेशनाच्या निमित्ताने राष्ट्रीय कामगार नेत्यांच्या तोफा कोल्हापूरात धडाडणार आहेत.
१८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयटकचे राष्ट्रीय सचिव कॉ. सुकुमार दामले (नवी दिल्ली) यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होईल. या उद्घाटन सत्रासाठी राज्याचे माजी कामगार मंत्री आ. हसन मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच याप्रसंगी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे राष्ट्रीय सहसचिव कॉ. देविदास तुळजापूरकर, आयटकचे राज्याध्यक्ष कॉ. सी. एन. देशमुख, राज्य सरचिटणीस कॉ. शाम काळे यांच्यासह अन्य केंद्रीय व राज्यस्तरावर कार्यरत कामगार संघटनांचे राज्य पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून या अधिवेशनात पहिल्या दिवशी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सायंकाळी ५ वाजता ज्येष्ठ साहित्यिक व कामगार नेते प्रा. तानाजी ठोंबरे ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कामगारविषयक धोरण’ या विषयावर मांडणी करणार आहेत. तसेच रात्री ८ वाजता आयटकचे जिल्हा सरचिटणीस शाहीर सदाशिव निकम यांचा प्रबोधनात्मक शाहिरी कार्यक्रम होणार आहे.
दि. १९ नोव्हेंबर रोजी पूर्ण दिवस प्रतिनिधी सत्र राहणार असून, यामध्ये राजकीय व संघटनात्मक अहवाल, तसेच अंगणवाडी, एम.एस.ई.बी., आशा वर्कर, बांधकाम कामगार, शालेय पोषण आहार कर्मचारी, ग्रामपंचायत कामगार, कोळसा कामगार, घरेलु मोलकरीण, औद्योगिक कामगार अशा विविध फेडरेशनच्या कार्यअहवालांचे सादरीकरण व त्यावर सखोल चर्चा केली जाणार आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त यादिवशी सायंकाळी ५ वाजता आयटकचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत कॉ. डॉ. भालचंद्र कानगो (नवी दिल्ली) यांचे ‘भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आयटकचे योगदान’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी त्यांच्या हस्ते अधिवेशन स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे.
दि. २० नोव्हेंबर रोजी आयटकच्या नूतन राज्य कौन्सिलची निवड तसेच नूतन राज्य पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता राजर्षी छत्रपती शाहू जन्म स्मृतिस्थळापासून कामगारांच्या भव्य रॅलीला प्रारंभ होणार आहे. ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरुन फिरुन ऐतिहासिक दसरा चौकात येणार असून, याठिकाणी दुपारी २ वाजता भव्य जाहीर सभा घेण्यात येणार आहे. या सभेसाठी आयटकच्या राष्ट्रीय महासचिव व लढाऊ राष्ट्रीय कामगार नेत्या कॉ. अमरजित कौर संबोधित करणार आहेत.