पुणे : प्रस्थापित ब्राह्मण्यवादी, भांडवली, पुरुषसत्ताक व्यवस्थे विरुद्ध विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र काम करत आहे. या चळवळीच्यावतीने १९९९ पासून राज्यस्तरीय विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन संघटित करण्यात येते. यावर्षी हे संमेलन पुणे येथे १० व ११ डिसेंबर २०२२ रोजी साने गुरुजी स्मारक येथे होणार आहे, अशी माहिती संमेलनाच्या संयोजन समितीच्यावतीने देण्यात आली.
पहिले विद्रोही मराठी साहित्य संमेलन धारावी – मुंबई येथे पार पडल्यानंतर कोल्हापूर, औरंगाबाद, सातारा, सावंतवाडी, पंढरपूर, धुळे, सोलापूर, इंदापूर, सांगली, राहुरी, बीड, शहादा याठिकाणी संमेलन झाले आहेत. राज्यातील ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक बाबुराव बागुल, वाहरूभाऊ सोनवणे, डॉ. यशवंत मनोहर, बाबा आढाव, राजन खान, डॉ. आ. ह. साळुंखे, राजा शिरगुप्पे, बाबुराव गुरव, रूपा बोधी – कुलकर्णी, नजुबाई गावित यांनी संमेलनाचे अध्यक्षपद जबाबदारीने पार पाडले आहे. तसेच उद्घाटक म्हणून निदा फाजली, एजाज अहमद, पी. सुरेंद्रम, कांचा इलाया, शाहीर गदर, क्रांतीवीर नागनाथ नाईकवाडी, हौसाताई पाटील, डॉ. बसवलिंग पट्टदेवरू, चंद्रशेखर पाटील इत्यादी संमेलनाचे उद्घाटक म्हणून राहिले आहेत.
विद्रोही साहित्य संमेलनाने वेगवेगळे विषय हाताळून खरा सांस्कृतिक संघर्ष उभा केला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या विरोधात बंड करून पर्यायी साहित्य संमेलनाचा मंच निर्माण केला आणि मुंबई येथील धारावीच्या झोपडपट्टीत पहिले विद्रोही साहित्य संमेलन घडवून आणले. दुसऱ्या विद्रोही साहित्य संमेलनात साहित्य आणि साहित्यिक विषय चर्चेला आला. सातारा येथील संमेलनात ‘वारकरी संतांचे साहित्य आणि रामदासाचे लिखाण’ या विषयावरील परिसंवादात गाजत राहिला आणि शिवरायांचे गुरु कोण? हा प्रश्न चर्चेला आला. विद्येची देवता सरस्वती की सावित्री? हा प्रश्न सावंतवाडी संमेलनात चर्चेला आला. पंढरपूरच्या मंदिरात वारकऱ्यांचा छळ करणारे व विठोबा रखुमाईवर मक्ता गाजाविणाऱ्या बडवे आणि उत्पात यांचा प्रश्न पंढरपूरच्या संमेलनात चर्चेला आला. बीड येथील संमेलनात मराठवाड्याच्या सांस्कृतिक व राजकीय प्रश्नांची चर्चा झाली आणि राहुरी संमेलनात ‘होय आम्ही राक्षस आहोत..!’ या विषयावर रोखठोक चर्चा झाली. शहादा येथील संमेलनात आदिवासींच्या वनवासीकरणाविरोधात जाहीर भूमिका घेतली व आदिवासी हिंदू नाहीत हे ठणकावून सांगितले. देशातील लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे. आतापर्यंत विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाने महाराष्ट्राचे सांस्कृतिक वर्तुळ वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करून ढवळून काढले आहे.
यावर्षी पुणे येथे होत असलेल्या विद्रोही साहित्य संमेलनासमोर देशात सुरू असलेल्या संविधानविरोधी, फॅसिस्ट – सांस्कृतिक राजकारणाचे आव्हान आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत संमेलन होत असताना, शिवरायांनी बैलाचा नांगर घालून स्वच्छ केलेल्या भूमीत पुन्हा तणकट वाढले आहे. ते मुळापासून उपटून टाकण्याचा प्रश्न आहे. तसेच राजमाता जिजाऊंनी वसवलेल्या पुण्याला गिळणाऱ्या पेशवाईला मनगटाने उत्तर देणारे भीमा – कोरेगावचे युद्ध आणि लहुजी वस्तादांच्या तालमीत तयार झालेल्या, बुध्दीचातुर्याने ब्राम्हण्यवादाला आवाहन देणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले इत्यादींनी निर्माण केलेली परंपरा हाच पुण्याचा मुख्य प्रवाह आहे. हे सांगण्यासाठी तसेच राज्याचे आणि राष्ट्राचे सांस्कृतिक धोरण काय असावे, हे पुन्हा एकदा प्रस्थापित करून देण्याचा उद्देश आहे.
यावर्षी पुणे येथे १० व ११ डिसेंबर २०२२ रोजी साने गुरुजी स्मारक येथे होत असलेल्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाला तमाम विद्रोही साहित्यिक, विचारवंत, कलावंत, कार्यकर्ते व जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजन समितीच्यावतीने निमंत्रक साथी नितीन पवार, आयु. मानव कांबळे, कॉम्रेड लता भिसे, कॉमेड मेधा थत्ते, तमन्ना इनामदार, कॉम्रेड धनाजी गुरव, जालिंदर घिगे यांनी केले आहे.