कॉ. स्मिता पानसरे यांना क्रांतिवीरांगना हौसाताई पाटील सामाजिक पुरस्कार प्रदान

सांगली : क्रांतिवीर भाई भगवानराव पाटील (बप्पा) जन्मशताब्दी समिती आणि खानापूर-कडेगाव तालुका साहित्यप्रेमी मंडळाच्यावतीने क्रांतिसिंह कॉ. नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिवीरांगना हौसाताई पाटील यांच्या नावाने दिला जाणारा पहिला सामाजिक पुरस्कार भारतीय महिला फेडरेशनच्या राज्याध्यक्ष कॉ. स्मिता पानसरे यांना प्रदान करण्यात आला. तसेच क्रांतिवीर भाई भगवानराव पाटील (बप्पा) सामाजिक पुरस्कार शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार भाई संपतराव पवार-पाटील यांना प्रदान करण्यात आला. कडेगाव तालुक्यातील हणमंतवडिये गावात झालेल्या या सोहळ्यात भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांच्या हस्ते पुरस्कार्थींना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी विचारमंचावर मंडळाच्यावतीने क्रांतिसिंह कॉ. नाना पाटील यांचे नातू ॲड. सुभाषराव पाटील, प्रा. विलासराव पाटील, सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार मोहनराव कदम, जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष आत्माराम मोरे, खजानिस भीमराव मोरे, साहित्यप्रेमी मंडळाचे अध्यक्ष आनंदराव पाटील, रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभागाचे अध्यक्ष माधवराव मोहिते, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य आबासाहेब देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व रोख ११,००० रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सत्काराला उत्तर देताना कॉ. पानसरे म्हणाल्या, हौसाक्कांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार माझ्यासारख्या चळवळीतील छोट्या कार्यकर्तीला बळ देणारा आहे. या पुरस्कारामुळे कोणत्याही परिस्थितीत लढत राहत, वैचारिक व कृतीशील वारसा जपण्याची ऊर्मी मिळाली आहे. अशा कार्यक्रमांतून समाजपरिवर्तनाला दिशा मिळण्यास मदत होणार आहे. देशातील धर्मांध, भांडवलशाहीचा पुरस्कार करणाऱ्या, संविधानाची पायमल्ली करणाऱ्या आणि गोरगरीब जनतेला विषमतेच्या खाईत लोटणाऱ्या मोदी सरकारला नामोहरम करण्यासाठी सर्व पुरोगामी विचारांच्या प्रवाहांनी एकत्र येत, संघर्ष तीव्र केला पाहिजे.

सत्काराला उत्तर देताना भाई संपतराव पवार म्हणाले, ज्यांनी आपले आयुष्य समाजाला वाहिले, त्या क्रांतिवीर भाई भगवानराव पाटील (बप्पा) आणि क्रांतिवीरांगना हौसाताई पाटील यांचे विचार समाजात रुजविण्याची नितांत गरज आहे. आज शेतीची अवस्था फारच वाईट झाली आहे. या स्थितीला सध्याचे राज्यकर्ते जबाबदार आहे. त्यांच्यामुळे राजकारणच नव्हे तर समाजकारणही बिघडले आहे. लोकशाही आज गुलामगिरीच्या वतनाखाली नांदत आहे. ही गुलामगिरी नष्ट करण्यासाठी सर्वांनी अंतर्मुख होत, समाजातील परिवर्तनवादी विचारांना दिशा देण्याची गरज आहे.

आजच्या दिशाहीन समाजाचे परिवर्तन होण्यासाठी क्रांतिवीर भगवानराव पाटील व हौसाताई पाटील यांच्या विचारांचा जागर करत, समाजाला जागृत करण्याची गरज आहे. आजच्या दिशाहीन समाजासमोर क्रांतिकारकाच्या बलिदानाच्या शौर्यगाथा आल्या पाहिजेत, असे मत अध्यक्षीय समारोप करताना कुलपती डॉ. कदम यांनी व्यक्त केले.

इंद्रजित पाटील यांनी स्वागत केले. विश्वनाथ गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. रघुराज मेटकरी व मन्सूर जमादार यांनी मानपत्राचे वाचन केले. यावेळी सौ. शकुंतला पवार, क्रांतिस्मृतिवनाचे संकल्पक भाई संपतराव पवार, बाबासाहेब महिंद, अजितराव सूर्यवंशी, सरपंच किशोर जाधव, उपसरपंच सतीश मोरे व सदस्य यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रियांका पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सदानंद माळी यांनी आभार मानले.

Leave a Comment

What does "money" mean to you?
  • Add your answer