कोल्हापुरात शहीद दिनानिमित्त स्टुडंटस् व युथ फेडरेशनचा कॅन्डल मार्च
कोल्हापूर : २३ मार्च १९३१ रोजी शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशी देण्यात आली. धर्मनिरपेक्षता, समाजवाद, मानवता या मूल्यांसाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिले. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर या मूल्यांवर धर्मांध शक्तींच्याकडून हल्ला सुरू झाला आहे. अशावेळी या मूल्यांवर आधारित शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचा वारसा जपण्यासाठी तरुणांनी पुढे यावे, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड सुभाष लांडे यांनी केले. बिंदू चौक येथे ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन व ऑल इंडिया युथ फेडरेशनच्यावतीने शहीद दिनानिमित्त आयोजित कॅन्डल मार्चप्रसंगी ते बोलत होते.
महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड राजन क्षीरसागर म्हणाले, सध्या भारतात लुटारू भांडवलशाही अस्तित्वात आली आहे. या भांडवलशाहीने धर्मांध शक्तींशी युती केली आहे. शेतकरी व तरुण बेरोजगार आत्महत्या करत आहेत. भगतसिंग हे भांडवलशाही व धर्मांधशक्ती विरोधात होते. तरुणांनी याविरुद्ध लढा उभारावा.
यावेळी गिरीश फोंडे, अनिल चव्हाण, प्रशांत आंबी यांचेदेखील भाषण झाले. यावेळी क्रांतिकारी गीतांचे गायन करण्यात आले. तसेच इन्कलाब जिंदाबाद, साम्राज्यवाद मुर्दाबाद, क्रांतिकारकांना लाल सलाम अशा घोषणांनी बिंदू चौक परिसर दणाणून सोडला.
कार्यक्रमाला हरीश कांबळे, राम करे, आरती रेडेकर, रावसाहेब आलासे, संतोष आंबेकर, रवी जाधव, धीरज कटारे, अभिजित खोत, सुनील कोळी, प्रा. डॉ. बाबुराव घुरके, श्रीकांत कोळी, उज्वला कांबळे, धर्मराज कांबळे, सौम्या भिलतिया, खुशी ढंग, रमेश वडणगेकर, कार्तिक पाटील, आकाश भास्कर, निलेश कांबळे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.