भारतीय कम्युनिस्ट पक्षाने दिला ‘भाजप हटाव – देश बचाव’चा देशव्यापी नारा

महाराष्ट्रात प्रभावीपणे जनजागरण मोहीम राबविण्याचा पक्षाच्या राज्य कौन्सिल बैठकीत निर्धार

मुंबई : देशात गेली ९ वर्षे सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात नरेंद्र मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणामुळे देशातील सर्वसामान्य जनता महागाई, बेरोजगारी व विषमतेच्या खाईत लोटली जात आहे. देशाची अर्थव्यवस्था पार रसातळाला गेली असून, एकूण लोकशाही व्यवस्था धोक्यात आणली जात आहे. अशा परिस्थितीत हुकूमशाही पद्धतीचे निर्णय घेणाऱ्या आणि जनविरोधी धोरणे राबविणाऱ्या भाजपला सत्तेतून हद्दपार करणे हाच एकमेव पर्याय आहे. यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने १४ एप्रिल ते १५ मे पर्यंत ‘भाजप हटाव – देश बचाव’ ही जनजागरण मोहीम देशभरात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोहीम महाराष्ट्रात प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या मुंबई येथे आज झालेल्या राज्य कौन्सिल बैठकीत करण्यात आला.

मुंबईतील प्रभादेवी येथील भुपेश गुप्ता भवन येथे पक्षाची राज्य कौन्सिल बैठक राज्य सचिव मंडळाचे सदस्य कॉ. नामदेव चव्हाण, कॉ. बबली रावत व कॉ. ईश्वरा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

बैठकीत बोलताना पक्षाचे राष्ट्रीय सचिव मंडळ सदस्य कॉ. डॉ. भालचंद्र कानगो म्हणाले, की भाजप सरकारने गेल्या ९ वर्षांच्या काळात संसदीय लोकशाही पद्धतीला तिलांजली देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपा आणि भ्रष्टाचार यांचा जवळचा संबंध हिंदेनबर्ग रिपोर्टच्या निमित्ताने अधिक उघड झाला आहे. सरकारच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही लेबल लावून विरोधी स्वर दाबण्याचा प्रकार होत आहे. भाजप सरकारने सामाजिक न्यायाच्या तत्वाला पूर्णपणे हरताळ फसला असून, एकीकडे दलितांवरील अत्याचार वाढत असताना, विविध घटनांमध्ये दोषी असणाऱ्या आरोपींना सरकार मोकाट सोडत आहे. अल्पसंख्यांकांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असून, समाजात दुही निर्माण केली जात आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून व राज्यपाल पदाचा दुरुपयोग करून विविध राज्यातील सरकार पाडण्याचे कारस्थान भाजपाकडून सातत्याने केले जात आहे. महाराष्ट्रातही हाच प्रकार गेल्यावर्षी दिसून आला असून, त्यामुळे लोकशाहीच धोक्यात येऊ लागली आहे. याशिवाय बेरोजगारीचे प्रश्न वाढत असून, शेतीवर देखील मोठ्या प्रमाणात हल्ले होते आहेत. कामगार, कर्मचाऱ्यांचे प्रश्न गंभीर होत असून, या कडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. अशा भाजप सरकारला धडा शिकविण्यासाठी त्यांना सत्तेवरून हटविण्यासाठी लोकांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन डॉ. कानगो यांनी केले.

पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. सुभाष लांडे यांनी या मोहिमेचा आढावा घेताना देश आणि राज्याच्या राजकारणावर भाष्य केले. तसेच राज्यात स्थापन झालेले असंविधानिक सरकार आणि त्यासाठी भाजपने केलेले कुटील कारस्थान यावर प्रकाशझोत टाकला. राज्यात लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता असून, जनतेला सशक्त डावा पर्याय देण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी राज्यभरातून आलेल्या पक्षाच्या राज्य कौन्सिल सदस्यांनी आणि जिल्हा सेक्रेटरींनी महाराष्ट्रात ही मोहीम राबविण्याबाबतचा कृतीआराखडा सादर केला. तसेच यावेळी मोहिमेच्या पोस्टर व प्रचार पत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. तुकाराम भस्मे, कॉ. राजन क्षीरसागर, कॉ. राम बाहेती, कॉ. राजू देसले, कॉ. स्मिता पानसरे, कॉ. श्याम काळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रक्षोभक भाषणे करणाऱ्यांवर खटले दाखल करा

महाराष्ट्रात सध्या हिंदू जनजागरण मोर्चाच्या माध्यमातून सामाजिक वातावरण दूषित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य करून, दोन समाजामध्ये दुही निर्माण होईल अशी प्रक्षोभक भाषणे या निमित्ताने केली जात आहेत. याबाबत टिप्पणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढत सरकार ‘नपुंसक’ असल्याचा ठपका ठेवला आहे. त्यामुळे निदान आतातरी सरकारने अशा प्रक्षोभक भाषणे करणाऱ्यांवर ताबडतोब खटले दाखल करून दोषींवर कडक कारवाई करावी, असा ठराव भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कौन्सिल बैठकीत एकमताने करण्यात आला.

Leave a Comment

What does "money" mean to you?
  • Add your answer