मुंबई : बँक कर्मचाऱ्यांच्या चळवळीचे राष्ट्रीय नेते कॉ. सुरेश धोपेश्वरकर (वय ८१ वर्षे) यांचे आज शनिवार दि. ८ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११.४५ च्या सुमारात दु:खद निधन झाले. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे ते माजी अध्यक्ष होते. तसेच महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे ते दीर्घकाळ महासचिव होते. बँक कर्मचाऱ्यांबरोबरच एलआयसी, जीआयसी, राज्य सरकारी कर्मचारी, ग्रामीण बँक कर्मचारी अशा अनेक संघटनांच्या उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ते सभासद होते.
रविवार दि. ९ एप्रिल २०२३ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत भूपेश गुप्ता भवन, रवींद्र नाट्य मंदिराजवळ, प्रभादेवी, मुंबई येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, त्यानंतर ५ वाजता दादर येथील विद्युतदाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
बँक कर्मचारी चळवळीत काम करत असताना कॉ. धोपेश्वरकर यांनी कामगार – कर्मचाऱ्यांना वर्गीय भान देत असतानाच साहित्य, कला, संस्कृती या विषयासंबंधीची जाणीव करुन देण्यात मोलाचा वाटा दिला. स्वत:च्या हक्कासंबंधी कोणतीही तडजोड न स्वीकारता संघर्षासाठीची त्यांची प्रेरणा, यामुळेच महाराष्ट्रातील बँक कर्मचारी चळवळ ही ‘कार्यकर्त्यांचं मोहोळ’ निर्माण करु शकली. राष्ट्रीयीकृत बँकांतील संचालक मंडळावर कर्मचारी प्रतिनिधी संचालक नेमणुकीच्या निर्णयानुसार ते बँक ऑफ महाराष्ट्रच्या संचालक मंडळातील पहिले संचालक होते. वयाच्या अखेरपर्यंत ८१ व्या वर्षीही ते सतत कार्यमग्न असायचे. विविध प्रासंगिक घडामोडींबरोबरच अर्थविषयक घडमोडींवर व्यासंगी लिखाण करण्याची त्यांची हातोटी होती. त्यांच्या निधनामुळे कामगार चळवळीचे तसेच पुरोगामी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या स्मृतिंना भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे क्रांतिकारी लाल सलाम.. भावपूर्ण आदरांजली.
3 thoughts on “बँक कर्मचारी चळवळीचे राष्ट्रीय नेते कॉ. सुरेश धोपेश्वरकर यांचे दु:खद निधन”
अखेरचा लाल सलाम धोपे साहेब!!
भावपूर्ण श्रध्दांजली.
Lal salam com Dhopeshwarkar