आंबेडकर जयंतीदिनी १४ एप्रिलला होणार नाशिक येथे वितरण
नाशिक : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव, आयटक कामगार संघटनेचे राज्य सचिव व महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड राजू देसले यांना स्वयंदीप समाज प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
स्वयंदीप समाज प्रबोधिनी संस्थेच्यावतीने महात्मा जोतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाअंतर्गत कॉ. देसले यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत व माजी पोलीस अधीक्षक डॉ. संजय अपरांती यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
कॉ. राजू देसले हे विद्यार्थी दशेपासून महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीत सक्रियपणे कार्यरत असून, गेली २५ वर्षे कामगार – शेतकरी वर्गासाठी अखंड संघर्ष करत आहे. ‘संविधानप्रेमी नाशिककर’चे ते निमंत्रक असून, त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.