राष्ट्रीय मान्यता काढल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सचिव मंडळाची बैठक संपन्न
नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्वपूर्ण योगदान दिलेल्या आणि श्रमिक-कष्टकरी वर्गांच्या हक्कांसाठी जनसंघर्षाचा समृद्ध वारसा लाभलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाची राष्ट्रीय मान्यता निवडणूक आयोगाने काढली आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथे पक्षाच्या मुख्य कार्यालयात राष्ट्रीय सचिव मंडळाची बैठक आज पार पडली. आयोगाने पक्षाची राष्ट्रीय मान्यता काढून घेतली असली तरी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष देशासाठी समर्पित सेवा आणि जनतेच्या हक्कांसाठी अखंड संघर्ष करण्यास कायम कटीबद्ध राहील, असे प्रतिपादन या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कॉ. डी. राजा यांनी केले.
याबाबत पक्षाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की निवडणूक आयोगाने पक्षाची राष्ट्रीय मान्यता काढून घेताना, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा समृद्ध इतिहास, ब्रिटीश राजवटीविरुद्धच्या लढ्यात त्याची प्रमुख भूमिका आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील राष्ट्रीय विकासाचा अजेंडा तयार करण्यात कम्युनिस्ट पक्षाची भूमिका यांचा योग्य विचार करायला हवा होता. देशातील लोकशाही राज्यव्यवस्था मजबूत करण्यात भारतीय कम्युनिस्ट पक्ष आघाडीवर आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षांपैकी एक असून, त्याचा विस्तार संपूर्ण भारतात आहे. सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता आणि समाजवादाच्या दिशेने देशाला पुढे नेण्यासाठी आणि संविधानाच्या आदर्शांचे रक्षण करण्यासाठी सर्वोच्च बलिदान देण्यात कम्युनिस्ट पक्ष कोणत्याही परिस्थितीत मागे राहणार नाही. भा.क.प. देशासाठी समर्पित सेवा आणि जनतेच्या हक्कांसाठी संघर्ष करत राहील.
निवडणूक आयोगाने पक्षाची राष्ट्रीय मान्यता काढून घेतली असली तरी, भा.क.प. देशभरात अधिक जोमाने आणि समर्पित भावनेने लोकांमध्ये काम करत राहील. त्याचवेळी, इंद्रजित गुप्ता समितीने शिफारस केल्यानुसार समानुपातिक प्रतिनिधित्व प्रणाली, निवडणूक रोखे रद्द करणे आणि निवडणुकीच्या राज्य निधीसाठी तसेच सर्वसमावेशक निवडणूक सुधारणांसाठी मोहीम तीव्र करेल. भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये काळाची आव्हाने स्वीकारण्याची आणि त्यावर मात करण्याची क्षमता आणि वचनबद्धता आहे, असा ठाम विश्वासही कॉ. डी. राजा यांनी यावेळी व्यक्त केला.
1 thought on “जनतेच्या हक्कांसाठी अखंड संघर्ष करण्यास भारतीय कम्युनिस्ट पक्ष सदैव कटीबद्ध : कॉ. डी. राजा”
देशाचा अर्धशिक्षित पंतप्रधान दुसरा कूठला विचार करणार?