मुंबई : कोकणात प्रस्तावित असलेल्या बारसू येथील रिफायनरीला स्थानिकांचा तीव्र विरोध होत आहे. कोकणातील नैसर्गिक अधिवास नष्ट करु पाहणाऱ्या या रिफायनरीच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. कार्ल मार्क्स यांच्या जयंतीदिनी ५ मे २०२३ रोजी पक्षाच्यावतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत. मुंबईत झालेल्या पक्षाच्या राज्य सचिव मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, पुढील आठवड्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव मंडळ बारसू येथे भेट देऊन स्थानिकांशी संवाद साधणार आहे. बैठकीला राज्य सचिव कॉ. ॲड. सुभाष लांडे, कॉ. तुकाराम भस्मे, कॉ. प्रकाश रेड्डी, कॉ. राजन क्षीरसागर, कॉ. राम बाहेती, कॉ. राजू देसले, कॉ. नामदेव चव्हाण, कॉ. स्मिता पानसरे उपस्थित होते.